Mon. Sep 27th, 2021

हापूसची फसवणूक पडणार महागात

परराज्यातील आंबा महाराष्ट्रात आणून तो कोकणातील हापूस आंबा असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणावर विकला जातो. साहजिकच यामुळे एकीकडे ग्राहकांची फसवणूक होते, तर दुसरीकडे कोकणातील हापूस आंबा विकणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे येथून पुढे बाहेरच्या राज्यातून आलेला आंबा त्याच नावाने न विकता त्याचे नाव बदलून विकला गेल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश कृषिमंत्रीदादा भुसे यांनी दिले आहेत

आंब्याच्या मोसमात मुंबई, पुणे, ठाणे नवी मुंबई यांसह राज्यात सर्वत्र कोकणातील हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर विकला जातो. ग्राहकांकडूनही या आंब्यासाठी मोठी मागणी असते. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेरही कोकणातील हापूस आंब्यांना मोठी मागणी आहे. हापूस आंब्याचे दर वाढले, तरी ग्राहक हवी ती किंमत मोजून हे आंबे खरेदी करतात. साहजिकच या आंब्यांच्या विक्रीतून होणाऱ्या लाखो रुपयांच्या नफ्यावर डोळा ठेऊन परराज्यातून मोठ्या प्रमाणावर आणलेले आंबे कोकणातील हापूस आंबा म्हणून विकण्याचा राज्यात सुळसुळाट आहे. याचा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होता. त्यांना जो आर्थिक फटका बसायचा तो बसतोच, पण याचा परिणाम ग्राहकांवरही होतो. कोकणातील हापूस आंब्याच्या नावावर दुसरेच आंबे विकून या ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती.

अलीकडेच कृषिमंत्री दादा भुसे कोकणाच्या दौऱ्यावर असताना, इतर प्रकारचा आंबा हा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात असल्याने  ग्राहकांची फसवणूक होत असल्याची बाब सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर भुसे यांनी ही बाब  बाळासाहेब पाटील, यांच्याशी संवांद साधून निदर्शनास आणून दिली. त्यानुसार आता कृषी उत्पन्न बाजार समितीने सोमवारी १२ एप्रिल रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार येथून पुढे ज्या राज्यातून, तसेच ज्या नावाने आंबा महाराष्ट्रात आला आहे, त्याच नावाने त्याची विक्री करावी. संबंधित आंब्याची त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *