Fri. Oct 7th, 2022

‘विरोधी पक्षातील आमदारांचा निधी थांबवला’

मंगळवारी विरोधी पक्षातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ तसेच काही आमदारांचा सहभाग होता अशी माहिती कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच आमदारांचा निधी यासह अनेक महत्वांच्या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णय फिरवण्याचा सपाटा लावला होता, तसेच शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदारांच्या निधीला देखील कात्री लावण्यात आल्याचा आरोपही विरोधकांकडून सतत होत आहे. यादरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील आमदारांचा निधी थांबवल्याचा आरोप केला आहे.

थोरात यांनी सांगितले की, बजेटमध्ये जो निधी देण्यात आला होता तो थांबवण्यात आले आहेत, इतरही अनेक फंड थांबवण्यात आले आहेत त्यामुळे, संपूर्ण राज्यातील कामे ठप्प झाली आहेत. पावसामुळे रस्त्यांची कामे होणे आवश्यक आहे ते देखील थांबले आहेत. त्यामुळे आमदारांच्या निधीला देण्यात आलेले स्टे उठवण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केल्याचे थोरात यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, यामध्ये महत्वाचा विषय हा विरोधी पक्षांच्या आमदारांचा निधीचा आहे. तो थांबवण्यात आला आहे, त्यामुळे असा भेदभाव करू नये, सर्व आमदारांशी सहकार्याने काम करावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.