Sat. Jul 2nd, 2022

विचारतोय गवा… सुधारणार कवा?

कोल्हापुरामध्ये मानवी वस्तीत गवा आला. वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली आणि दुसऱ्याच दिवशी गव्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली. त्यानंतर कोणी या घटनेसाठी वनविभागाला जबाबदार धरत आहेत, कोणी हुल्लडबाजी करणाऱ्यांना तर कोणी गव्याला. पण या सर्वात मानवी वस्तीत गवा आल्यानंतर काय करायला हवे याचे उत्तर आता गवा मागत आहे. उपाययोजना न करता आणखी किती मानव आणि गवा संघर्ष होणार, असा त्याचा प्रश्न आहे. म्हणूनच आज कोल्हापुरात येऊन सर्वांनाच ‘विचारतोय गवा… सुधारणार कवा?’

भारदस्त गव्याचे सर्वांनाच आकर्षण असते आणि त्याच उत्सुकतेपोटी सगळे गवा पाहायला पंचगंगा घाटाकडे अनेक जण वळले. जंगलात कधीही ही स्थिती न अनुभवलेल्या गव्याने माणसांची ही गर्दी पाहून एका जागीच बसणे पसंद केले. माणसांची गर्दी ओसरताच मोठ्या ट्राफिक मधूनही हा गवा संयमाने आपल्या वाटेने निघून गेला. मात्र पुढे भुयेवाडी गावात गव्याच्या मागे गेलेल्या तीन तरुणावर गव्याने हल्ला चढवला, यात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. त्यामुळे ‘मानव गवा’ हा संघर्ष नेमका कसा हाताळायचा, याची माहिती घेणे महत्वाचे आहे.

वनविभागाने ११ जुलै २०१५मध्ये याची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या मानवी वस्तीत गवा आल्यास त्याला हाताळायचे कसे, हे नमूद केले आहे. शिवाय मानवी वस्तीत गवा येऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची हेसुद्धा यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गवा हा साधारण ६५० किलो ते १००० किलो इतक्या वजनाचा असतो. लांबी ८ ते १० फूट तर उंची ७ फुटापर्यंत असते. जमिनीवरील मोठ्या प्राण्याच्या संख्येत गव्याची गणना केली जाते. त्यामुळे भारदस्त आणि ताकदवान म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. वायनाड, नागरहोले, बंदिपूर आणि कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्य ही गव्याची माहेरघरे आहेत. देशात २१ हजार गवे असल्याची नोंद आहे.

गव्याचे राहणीमान ठरलेले असून जिथे मानवी हस्तक्षेप कमी, तिथे गव्याचा दिनचर असतो. विशेषतः कळपाने गवा राहत असतो. पूर्ण वाढ झालेले गवे एकटेच राहतात त्यांना ‘एकुल’ म्हणतात. मानवी वस्तीपासून दूर असलेले गवे फार लाजाळू असतात. माणसांची चाहूल लागताच ते पळून जातात. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील गव्यांच्या या जगण्यात सध्या बदल दिसून येत आहे. ते संधी मिळताच पिकात घुसत आहेत. आक्रमक गवे लोकांवर हल्ले करतात. उन्हाळा आणि परजीवींच्या त्रासाने एकुल गवे फार तापट आणि आक्रमक होतात. मात्र गवे स्वतःहुन हल्ले करत नसल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. लोकांच्या गोंगाटामुळे, आरडाओरडा, पाठलागामुळे गवा दिशाहीन होतो. सैरभैर झालेला गवा अशावेळी हल्ला करतो किंवा या सगळ्या गोंधळात दमल्याने घाबरून जाऊन मृत्यू होतो. त्यामुळे हे सगळे टाळण्यासाठी वनविभागाने दिलेली मार्गदर्शक तत्वे अवलंबण्याची गरज आहे.

या तत्वांमध्ये प्रामुख्याने वनविभागाने कसे वागायचे, नागरिकांनी कसे वागायचे, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना कोणत्या दक्षता घ्याव्यात, हे नमूद केले आहे.

 • भविष्यात गवा आणि मनुष्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी खालील काही मुद्यांचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे.
 • जंगल परिसरात गवताळ कुरणांचा विकास होणे आवश्यक आहे.
 • प्रत्येक वनपरिक्षेत्रातील नैसर्गिक गवताळ कुरणांचे जी.पी.एस. लोकेशन घेवून त्यांची नोंद होणे आवश्यक आहे. त्याच बरोबरीने त्या-त्या वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांनी गवताळ कुरणांवर गवा तसेच इतर वन्यप्राण्यांच्या विष्ठा, खुणा, प्रत्यक्ष नोंदी घ्याव्यात व त्याची नोंद वही ठेवावी. या नोंदी वर्षभरातील प्रत्येक ऋतूत घेण्यात याव्या. अशा सव्हना वनकर्मचाऱ्यांनी संख्या मर्यादित असल्याने स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी घ्यावेत. यातून वर्षभरात एक शात्रोक्त माहिती उपलब्ध होण्यास मदत होवून गवताळ कुरणांबाबत उपाययोजना करण्यास मदत होईल.
 • नैसर्गिक कुरणांवर प्लॅटेशन करणे अयोग्य आहे. गवताळ कुरणांची एक स्वत:ची इकोसिस्टिम असल्याने त्याचे महत्व समजून घ्यावे.
 • ऍकेशिय, ऑस्ट्रेलियन बाभूळ व इतर विदेशी वनस्पती यांचे प्लॅटेशन त्वरीत थांबवावे, जुनी रोपवने आहेत ती गवताळ क्षेत्रात परिवर्तित करणे फार महत्त्वाचे आहे.
 • पश्चिम घाटातील रबर प्लॅटेशनवर त्वरीत बंदी घालावी. रबर प्लॅटेशनसाठी आलेले लोक गव्यांची शिकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 • गव्याच्या खाद्य वनस्पती व वर्तणूकीच्या अभ्यासासाठी वनस्पती अभ्यासक आणि वन्यप्राणी अभ्यासक यांची एकत्र समिती नियुक्त करावी.
 • गव्याच्या वर्तणूकीबाबत माहिती देणारा माहितीपट तयार करावा तसेच भित्तीपत्रकांचे गावागावात वाटप करावे. गवा बाधित क्षेत्रात गव्यांबाबत माहिती देणारे माहिती फलक बसवावेत. गव्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग अनेकदा निश्चित असल्याने अशा ठिकाणी सावधानतेचे फलक लावावेत.
 • गवा दाखवून पर्यटन विकास करणे शक्य आहे.

गवा आपल्या परिसरात आल्यास खबरदारी घेत आपण गव्यापासून स्वतःला सुरक्षित राखू शकतो, त्यासाठी खालील सूचनांचे पालन करावे:

 • गवे पहाटेच्यावेळी तसेच सायंकाळी उशिरा चरण्यास जंगलातून बाहेर पडतात. ही वेळ लक्षात घेऊन शेतात जाण्याचे नियोजन करावे.
 • शेताच्या व गावाच्या आसपास गव्यांचा कळप आढळल्यास दुरुनच त्यांना हुसकावण्याचे प्रयत्न करा.
 • गव्यांचा पाठलाग करु नये; ते उलटून हल्ला करु शकतात.
 • गया अंगावर धावून आल्यास पायवाट सोडून झाडीत अगर शेतात शिरावे. शेतातील विहीरींना पुरेसे बंदिस्त करावे, जेणेकरून गवे त्यावर पाणी पिण्यास येणार नाहीत.
 • जंगलातील गवती कुरणांवर पाळीव गाईगुरे चरण्यास सोडून चारा संपवू नये. गव्यांचे जंगलातील नैसर्गिक खाद्य असलेल्या बांबू वनस्पतींचे संवर्धन करावे.
 • गवे शेतात अथवा गावात शिरल्यास अनावश्यक गोंगाट न करता स्थानिक वनविभागास सुचित करावे.

मात्र वारंवार वन्यप्राणी आणि माणूस यांच्यात झालेल्या संघर्षाला प्राण्यांनाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे वन्यप्राण्याबाबत आखलेली धोरणे योग्य पद्धतीने राबवण्याची गरज आहे. शिवाय लोकांना जागृत करत वनविभागाने अशा प्राण्यावर तो त्याच्या अधिवासात जाईपर्यंत लक्ष केंद्रित करायला हवं तरच हा संघर्ष थांबेल अन्यथा अशा दुर्दैवी घटनांना सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपेल. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपणच स्वतःला सुरक्षित ठेऊन वन्यप्राण्यांना त्यांच्या वाटेने जायला मदत करूया.

– ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.