Thu. Mar 21st, 2019

समलिंगी प्रेमाचा त्रिकोण… बॉयफ्रेंडने केली बॉयफ्रेंडची हत्या!

0Shares

समलैंगिक संबंध हे जरी आता कायद्यानुसार गुन्हा ठरत नसले, तरी समलिंगी संबंधांची परिणती गुन्हेगारीत होण्याच्या घटना घडत आहेत. आत्तापर्यंत आपल्या बॉयफ्रेंडचे दुसऱ्या मुलीशी असणाऱ्या प्रेमसंबंधांमुळे किंवा मुलीचे दुसऱ्या पुरुषाशी असणारे संबंध असल्याच्या संशयामुळे बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंडमध्ये होणाऱ्या वादाच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण मुंबईतल्या वांद्रे भागात आपल्या बॉयफ्रेंडचे दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याच्या संशयातून एका समलिंगी तरुणाने आपल्या ‘बॉयफ्रेंड’ची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी धवल उनाडकट या 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

फेसबुकवर झाली तिघांची मैत्री!

हॉटेल व्यावसायिक धवलची फेसबुकच्या माध्यमातून पार्थ रावल आणि मोहम्मद आसिफ या दोन तरुणांशी झाली. या तिघांमध्ये नंतर समलिंगी संबंध निर्माण झाले. मात्र काही काळानंतर आसिफ आणि धवल यांच्यात वाद झाला. त्यानंतर धवलने आसिफशी संबंध तोडले.

या प्रकरणानंतर धवल 4 नोव्हेंबर रोजी आसिफ याच्या हिल रोड येथील घरी गेला. मात्र त्यावेळी आसिफच्या घरी पार्थला पाहून धवलला धक्का बसला. या कारणावरून तिघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि भांडणादरम्यान धवलने मेणबत्तीचा स्टँड पार्थच्या डोक्यात घातला. पार्थचं डोकं फुटल्याचं लक्षात आल्यावर धवल आणि आसिफनेच पार्थला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला मोठ्या रूग्णालयात नेण्यात आलं. तेथे प्रथमोपचार करून पार्थला आसिफच्या घरी आणलं आणि बेडरूममध्ये झोपवण्यात आलं.

यानंतर आसिफ दुसऱ्या खोलीत तर धवल आपल्या घरी निघून गेले. मात्र संध्याकाळी आसिफ जेव्हा पार्थच्या खोलीत गेला, त्यावेळी पार्थ त्याला मृतावस्थेत आढळून आला.

या प्रकरणी धवलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे समलिंगी संबंधांतून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *