GDP चा दर निचांकी, बेरोजगारीचा टक्का 45 वर्षांतील सर्वाधिक!

मोदी सरकारची सत्ता पुन्हा एकदा स्थापन झाली आहे. मात्र आधीच्या सरकारमध्ये केलेल्या त्यांच्या अनेक घोषणा अद्याप पुऱ्य़ा झालेल्या नाहीत.
भारताचा GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर घसरलाय. गेल्या पाच वर्षातला हा सर्वात निचांकी दर आहे. जगात वेगानं विकसीत होत असलेली भारताची अर्थव्यवस्था गेल्या पाच वर्षात सर्वात खाली गेलीये.
2018-19 मार्च मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये जीडीपीचा दर 5.8 वर आलाय. केंद्र सरकारनं ही आकडेवारी जाहीर केलीये.
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये देशाचा जीडीपी 6.8 होता.
गेल्या वर्षी याच वेळी जीडीपीचा दर 8.1 होता. समोर आलेल्या आकड्यांनुसार सर्व प्रमुख क्षेत्रांचा वाढीचा दर कमी झाल्यानं जीडीपी कमी झाल्याचं दिसतंय.
कृषी, वाणिज्य आणि मत्स्य पालन या क्षेत्रांच्या वृद्धीचा दर 5 टक्यांवरुन 2 टक्यांवर आलाय.
खणन उद्योगाच्या वृद्धीचा दर 5 टक्यांहुन 1.3 टक्यांवर आलंय. याचा परिणाम जीडीपीवर झालाय.
बेरोजगारीही सर्वाधिक
भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्यासंदर्भातील दावा मोदी सरकारने पूर्वी केला होता. मात्र भारतात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खुद्द सांख्यिकी मंत्रालयाकडूनच हे सिद्ध झालंय.
सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार बेरोजगारीचा दर 6.1% आहे.
ही टक्केवारी गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक असल्याचं समोर आलंय.
ही आकडेवारी सांख्यिकी मंत्रालयाचा अधिकृत अहवाल लीक झाल्यामुळे जाहीर झाल्याचं सांगण्यात येतंय.
सरकारची सारवासारव
सरकारने मात्र यावर सारवासारव केली आहे.
हा अहवाल अंतिम नाही असं आता सांगण्यात येतंय.
मात्र समोर आलेला बेरोजगारीचा टक्का हा मोठा आहे.
शहरी भागात 7.8% बेरोजगार आहेत, ग्रामीण भागात 5.3% बेरोजगारी आहेत.
देशातील 6.2% पुरुष बेरोजगार आहेत, तर 5.7% महिला बेरोजगार आहेत.
मोदी सरकार देशात पुन्हा एकदा स्थापन झाल्यावर ही आकडेवारी समोर आली आहे. यापूर्वी दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मात्र हे आश्वासन अर्थातच पूर्ण झालं नसल्याचं दिसून आलंय. तरीही मोदी सरकारला पुन्हा एकदा जनतेने बहुमताने निवडून दिलंय. त्यामुळे आता तरी बेरोजगारीचा टक्का कमी होणार का असा प्रश्न आहे.