Fri. Oct 7th, 2022

एसी लोकलमुळे वातावरण गरम

मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलवरुन आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने ‘सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकल वाढवल्या’ आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर रेल्वेच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा करत जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

मंगळवारी दुपारी २ वाजता सीएसएमटी येथील विभागीय व्यवस्थापकीय कार्यालयात जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलच्या प्रश्नावरुन रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जवळपास दोन तास याप्रकरणी बैठक झाली. एक तर एसी लोकलचे तिकट दर चांगलेच महाग आहेत. ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी आहे. दुसरे असे की, एक लोकल एकाच वेळी जवळपास चार ते पाच हजार प्रवाशांना घेऊन प्रवास करते. एसी लोकल जेव्हा फलाटाला लागते तेव्हा त्यात सरासरी केवळ एक हजार लोकच चढतात. अशा स्थितीत फलाटावर राहणाऱ्या उर्वरीत तीन ते चार हजार लोकांचे काय करायचे? या गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे? या प्रश्नाचे कोणतेच उत्तर रेल्वे देत नाही. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

रेल्वेने एसी लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करत त्या जागी एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ठाणे, मुंब्रा, कळवा, बदलापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून प्रवासी आंदोलन करत आहेत. सकाळची वेळ ही नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरातून चाकरमान्यांची शहरात येण्याची वेळ असते. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात हे सर्व प्रवासी प्रवासासाठी फक्त लोकलवर अवलंबून असतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत एकही लोकल रद्द झाली तरी ४ ते ५ हजार लोकांचा खोळंबा होतो. त्यामुळे लोकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होते. अशात रेल्वेने लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे फार हाल होत आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

1 thought on “एसी लोकलमुळे वातावरण गरम

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.