Wed. Jun 16th, 2021

नाटक Review : समकालीन राजकारणावरील नेत्रदीपक भाष्य – ‘घटोत्कच’

महाभारताची कथा सर्वश्रुत आहेच. कुरूक्षेत्रावरील युद्ध, त्यासाठी आपल्याच नातेवाईकांशी लढायला उभे ठाकलेले कौरव, पांडव आणि त्यांच्या सोबत अनेक औक्षहिणी सैन्य. या युद्धात भीमाचा हिडिंबेपासून झालेला पुत्र घटोत्कच याने आपल्या राक्षसी सामर्थ्याने केलेला पराक्रम आणि पांडवांसाठी केलेलं बलिदान याची कथा महाभारतातून आपल्याला समजते. घटोत्कचाचं भीमाशी असणारं नातं संस्कृतातल्या भासरचित ‘मध्यमव्यायोग’ नाटकातूनच आत्तापर्यंत समोर आलं. मात्र मराठी रंगभूमीवर सध्या सादर होत असणाऱ्या ‘घटोत्कच’ या नाचकातून केवळ महाभारतातील कथाभाग समोर न येता एक जळजळीत राजकीय भाष्य आपल्यासमोर उलगडत जातं.

 कधीकाळी आर्यपुत्र भीमाने जंगलातील राक्षसी हिडिंबेशी केलेला तात्पुरता विवाह आणि त्यातून जन्मलेलं आपत्य घटोत्कच. खरंतर वडिलांना त्याची आठवणही नाही. मात्र त्यांना आपली गरज आहे, हे समजल्यावर आईच्या विरोधाला न जुमानता पांडवांच्या सैन्यात डेरेदाखल होतो. शत्रूला भयभीत करणारा पराक्रमही गाजवतो. अखेर अर्जुनाशी लढताना वापरण्यासाठी राखून ठेवलेली वासवी शक्ती घटोत्कचावर खर्ची करून त्याला संपवण्याचा दबाव कर्णावर येतो. कर्णाला वासवी शक्तीने घटोत्कचाला मारावं लागतं. त्या ही प्रसंगी धारातीर्थी पडताना आपला धिप्पाड देह पांडवांच्या नव्हे, तर कौरवांच्या सैन्यावर पाडून शक्य तितकं त्यांचं सैन्य चिरडून मारायचा आदेश दिला जातो.

गेल्या काही काळात राजकीय पटलावर घडणाऱ्या घटनांशी ही महाभारतातील आदिम कथा परखड भाष्य करून जाते. शासकांची युद्धपिपासा आणि त्यात कर्तव्यनिष्ठेला सर्वोपरी मानून शहीद होणारे सैनिक. किंवा निवडणुकीचा धुरळा, सत्ता मिळवण्यासाठी रणनीती आखणारे नेते आणि याच नेत्यांचा रांगेत बसून प्रतिष्ठा मिळवण्याच्या अहमहमिकेपोटी बळी पडणारे कार्यकर्ते… यांचीच कथा घटोत्कचमधून सादर होते.

घटोत्कचाचं अर्धराक्षस असणं आणि युद्धात सहभागी होऊन आर्यांशी संबंध सुधारण्याचं स्वप्नरंजन असो, किंवा अर्जुनाला अभिमन्यूच्या पराक्रमाचा स्वरचित इतिहास सांगणं असो या प्रसंगातून सद्यस्थितीवर नेमकं भाष्य केलं गेलंय. धर्म आणि भीमाचा युद्धाच्या खेळी करताना फारसं सख्य नसलेल्या आपल्याच नातेवाईकांचा केलेला वापर, सैनिकांचा सातत्याने बाजारबुणगे असा उल्लेख राजकीय परिस्थितीवर नेमकं बोट ठवतो.

ही कथा जितकी घटोत्कचाची आहे तितकीच कर्णाचीही आहे. उपकारांच्या ओझ्याखाली दबून स्वप्नांना मूठमाती देणारी उलट आपल्याच जीवावर बेतणारी खेळी करायचा कर्णावर असलेला दबावही मर्मभेदी आहे. दुष्काळग्रस्त जनतेला उदात्त स्वप्न दाखवणारा राजा, पुत्रवियोगाने रडणाऱ्या मातांसाठी अनाथालय स्थापन करण्याची घोषणा करणारा धर्म यांसारख्या अनेक लहान लहान घटनांतून घटोत्कच नाटक आकार घेतं.

प्रोसेनियम आर्कची सवय असणाऱ्या प्रेक्षकांना हे जानपद रंगभूमीच्या अंगाने जाणारं नाटक विलक्षण अनुभव देऊन जातं. नाटकातील सर्वच प्रसंग तत्वज्ञानाच्या पातळीवर अव्वल आहेत. याबद्दल नाटककाराचं अभिनंदन. समकालीन परिस्थितीवर अचूक मर्मभेदी भाष्य करण्यासाठी केवळ उपयुक्त कथाच निवडून न थांबता त्यातील प्रत्येक प्रसंग आपलं तत्वज्ञान मांडतो. तरीही अखेरचा प्रसंग सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी spoon feeding सारखा समोर येतो. नाटक शब्दबंबाळ न राहता हे नाटक कायिक आणि वाचिक अभिनयाचा आविष्कार घडवतं. युद्धाच्या प्रसंगांसाठी वापरलेला नृत्य आणि मार्शल आर्ट्सचा वापर कौतुकास्पद आहे. त्यासाठी वापरलेली प्रकाशयोजनादेखील वाखाणण्याजोगी आहे. मात्र क्लायमॅक्सचं कर्ण आणि घटोत्कच युद्ध आणखी विस्तृत आणि रोमांचक करता येऊ शकतं. अनागर संस्कृतीत नाटक सादर करताना संस्कृत नाटकाचा बाज वापरल्यामुळे दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव याने बाजी मारली आहे. मंचावरील मॉबचा फॉर्मेशन्ससाठी सुयोग्य वापर केल्यामुळे नाटक नेत्रदीपक बनतं.

नाटकाचं संगीत कथेचा बाज राखणारं असलं, तरी रेकॉर्डेड संगीताऐवजी लाईव्ह संगीत किंवा मॉबच्या clapping, tapping किंवा आरोळ्यांमधून जर संगीतनिर्मिती केल्यास ती अधिक परिणामकारक झाली असती.

कलाकारांनी आपली पात्रं विलक्षण ताकदीने साकारली आहेत. धर्मराज आणि भीम यांच्या पात्रांमध्ये दाखवलेली कूटिलता पारंपरिक महाभारतप्रेमींना दुखावू शकते. मात्र ‘Historicisation constitutes a fundamental interpretative attitude’ हे ब्रेख़्तचं सूत्र ‘घटोत्कच’ नाटकातून बऱ्याच काळाने पाहायला मिळतं. एकूणच हे नाटक कला, रंग, नाद या पातळींवर विलक्षण अनुभव देऊन जातं.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *