‘भारताच्या लोकशाहीचा गौरव दिवस’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये भाजप बहुमताने सत्तेवर आला आहे. तर पंजाबमध्ये आप पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेस पक्षांशिवाय देशाचे राजकारण चालू शकते, असे या विधानसभा निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
देशाच्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवले आहे. विधानसभा निवडणूकींच्या निकालानंतर भाजप मुख्यालयात भाजपाची विजयसभा घेण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयात जनतेला संबोधित केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपाचे वरिष्ठ नेते भाजपा मुख्यालयात उपस्थित होते.
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘भारत माता की जय’ या जयघोषात भाजपा मुख्यालयात भाषणाला सुरूवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यंदा होळीचा उत्सव १० मार्चपासून सुरू झाला आहे. देशातील पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आल्यामुळे हा भारताच्या लोकशाहीचा गौरव दिवस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
‘गरिबाला हक्क मिळवून देणार’
भाजपाच्या विजयाचा चौकार कार्यकर्त्यांमुळे शक्य झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे ते म्हणाले, सत्तेत राहूनही भाजपाविरोधी जनतम नाही. जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत भाजपाने पारदर्शकता आणली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गरिबाला त्याचे हक्क मिळवून देणार असल्याचे आश्वसनही त्यांनी दिले आहे.
‘भाजपाला महिलांचा पाठिंबा’
देशातील महिलांच्या अपेक्षा भाजपाच पूर्ण करत आहेत. त्यामुळे भाजपाला माता-भगिनींचे प्रचंड आशिर्वाद असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. महिलांचा भाजपाला पाठिंबा असून महिलांनीच भाजपाला प्रचंड मतदान करून निवडू आणल्याचे ते म्हणाले. तसेच जातीच्या बंधनात अडकवून उत्तर प्रदेशावर कायम अन्याय होत आला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाला बदनाम करणाऱ्यांना लोकांनीच धडा शिकवला असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘भारत शांततेचा आग्रही’
२०२२च्या निकालाने २०२४चे निकाल निश्चित केले आहेत. तसेच आता पंजाबमध्येही भाजपा संघटनात्मक मजबूत करूया असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोनाकाळात तसेच युद्धाने भारतासमोर आव्हाने उभी केली आहेत. मात्र, जागतिक आव्हानातही भारताची आत्मनिर्भतेकडे वाटचाल असल्याचे ते म्हणाले. युद्धाचा जगावर मोठा परिणाम झाला, परंतु भारत शांततेचा आग्रही आहे. तसेच युद्ध लढणाऱ्या देशांवर भारताचे अवलंबित्व असल्याचेही ते म्हणाले.
‘जनता घराणेशाहीचा अंत करेल’
युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांना आम्ही ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी सुखरुप आणले. परंतु दुसरीकडे ऑपरेशन गंगाच्या बदनामीचे अनेक प्रयत्न झाले. निवडणुकीदरम्यान, आम्ही विकास आधारित मते मागितली. तर घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे नुकसानच केले आहे. त्यामुळे एकदिवस जनता घराणेशाहीचा नक्की अंत करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरूच राहणार’
देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भ्रष्टाचाऱ्यांचे समर्थक तपास यंत्रणांना बदनाम करत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईविरोधात धर्म, जात आणि प्रादेशिकतेचा बचाव उभा केला जातो. मात्र जनेतेने भाजपाला भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढायला मत दिले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.