गोवा विधानसभा निवडणूक : भाजपकडून ३४ उमेदवारांची यादी घोषित

गोवा विधानसभा निवडणुकींसाठी भाजपकडून ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी न देता, विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘गोव्यात भाजपचे ३४ जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले असून पणजी मतदार संघातून भाजपच्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपा पर्रिकरांचे स्वप्नपूर्ती करत असून गोव्यात भाजपालाच पूर्ण बहुमत मिळेल’, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. गोव्यात भाजपचे ३४ जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तसेच आम्हाला पर्रिकर परिवाराविषयी आदर आहे. उत्पल पर्रिकर आणि त्यांच्या परिवारातील कोणताही सदस्य असो, सर्व आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणे आहेत. ते सर्वजण आमच्या जवळचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.