‘क्रोकोडाइल हंटर’ इरविन यांना डुडलद्वारे गुगलची अनोखी मानवंदना

गुगलने आज आपल्या होमपेजवर ‘क्रोकोडाइल हंटर’ या नावाने ओळखले जाणारे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचे विशेष डुडल तयार करून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
स्टीव्ह इरविन यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1962 रोजी झाला.
त्यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त गुगलने खास डुडल साकारलं आहे.
स्टीव्ह इरविन यांना मगरींविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळेच त्यांना ‘क्रोकोडाइल हंटर’ हे टोपण नाव मिळाले.
पशू-पक्ष्यांशी मैत्री करणाऱ्या इरविन यांच्या सन्मानार्थ 15 नोव्हेंबर हा दिवस ‘स्टीव्ह इरविन डे’ म्हणून साजरा केला जातो.
गुगलने साकारलेल्या या डुडलमध्ये अनेक स्लाइड्स तयार करून त्यातून इरविन यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम अधोरेखित केले आहे.
ते कुटुंबवत्सलही होते हे स्लाइड्सद्वारे दाखवले आहे. पशूप्रेमी असलेले इरविन हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-कीपर म्हणूनही कार्यरत होते.
इरविन यांनी पत्नी टेरी यांच्यासोबत अनेक वाहिन्यांवर मगरींच्या जीवनाशी संबंधित ‘क्रोको फाइल्स’, ‘द क्रोकोडाइल हंटर डायरीज’ आणि ‘न्यू ब्रीड वेट्स’ आदी वाइल्डलाइफ डॉक्युमेंट्री सादर केल्या आहेत.
स्टीव्ह इरविन यांनी अनेक वन्यजीव, पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध लावला आहे.
डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक आणि अॅनिमल प्लॅनेट आदी टीव्ही वाहिन्यांवर स्टीव्ह इरविन यांचे शो असायचे.
2006मध्ये समुद्रातील जीवांवर आधारित एका अंडरवाटर शूटिंगच्या वेळी स्टिंग-रे या माशाने दंश केल्याने स्टीव्ह इरविन यांचा मृत्यू झाला.