Mon. Sep 27th, 2021

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलचा अनोखा संदेश

आज जगभर जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जात आहे. या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून सर्वांना एक अनोखा संदेश दिला आहे. ‘पृथ्वीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येकाने एक बीज रोपण करावे’, असा संदेश गुगलने या डूडलमार्फत दिला आहे. दरवर्षी जागतिक वसुंधरा दिवस साजरा करताना एक थीम तयार करण्यात येते. या वर्षीच्या वसुंधरा दिनासाठी ‘रिस्टोअर अवर अर्थ’ ही थीम आहे.

सजीवांच्या जीवनात वसुंधरेचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या पृथ्वीचे आणि त्यावरील पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच जागरुकता निर्माण करण्यासाठी 1१९७० पासून आजतागायत जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जात आहे. सध्या जगासमोर जागतिक तापमान वाढ, प्रदुषण आणि पर्यावरणासंबंधी इतर अनेक समस्या अशी अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करणे, पर्यावरणाची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.

अमेरिकेन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या दिवसाची कल्पना मांडली होती. त्यांच्या या कल्पनेला जगभरातून मान्यता मिळाली आणि १९७० साली पहिल्यांदा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण याचे महत्व समजून घेऊन शाश्वत विकासाकडे पाऊल टाकले पाहिजे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *