केतकी चितळेचा ताबा गोरेगाव पोलीस घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्ट प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या जामिनावर सुनावणी वेळी गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेण्यासाठी पोहोचले. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार, केतकी चितळेचा गुरुवारी गोरेगाव पोलीस ताबा घेणार आहेत.
ठाणे पोलिसांनी घेतला निखिल भामरेचा ताबा
तसेच दुसरीकडे नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या निखिल भामरेचा ठाणे पोलिसांनी ताबा घेतला आहे. शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा १ने निखिल भामरेल ताब्यात घेतले आहे. नाशिक न्यायालयात असताना ठाणे क्राईम ब्रँचने निखिल भामरेला ताब्यात घेतले आहे. तसेच, ठाणे पोलिसांकडून निखिल भामरेला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निखील भामरेच्या ट्विटचा फोटो शेअर करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती.