Sat. Jul 31st, 2021

दिशा रवीने दिल्ली पोलिसांविरोधात घेतली न्यायालयात धाव

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्याच्या आडून कट-कारस्थान केल्याच्या आरोपाखाली दिशा रवीला १३ फेब्रुवारीला बंगळुरूहून अटक करण्यात आली. त्यानंतर दिशाला अनेकांनी पाठिंबा दिला. दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आणि सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर असलेल्या दिशा रवीने दिल्ली पोलिसांविरोधातच आता न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात दिशाने याचिका दाखल केली असून ‘या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा माहिती लीक केली जाऊ नये, याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात यावेत’, अशी मागणी दिशा रवीने केली आहे.

दिशा रवीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर तिला ३ आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अशा प्रकारे प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा व्हॉट्सअ‍ॅप चॅट किंवा त्याचा काही भाग प्रसारमाध्यमांमध्ये लीक केला जाऊ नये’, अशी मागणी दिशा रवीकडून करण्यात आली आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून दिशा रवी आणि स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्यातील कथिक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा काही भाग सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये देखील व्हायरल होत असल्यानं त्यावरून दिशा रवी आणि ग्रेटा थनबर्ग यांनीच कथित टूलकिट व्हायरल केल्याचा निष्कर्ष देखील काढण्यात आला आहे.

दिशा रवीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय दिशाच्या अटकेची दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली असून तिला नियमबाह्य पद्धतीने अटक करण्यात आल्याची नाराजी आयोगाने व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण देखील मागवण्यात आलं आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी मात्र, दिशाची अटक नियमांना अनुसरूनच झाल्याचं म्हटलं आहे. ग्रेटा थनबर्गने ट्वीट केलेलं वादग्रस्त टूलकिट आपण तयार केलं नसून त्यातल्या फक्त दोन ओळी मी बदलल्या होत्या आणि हे सगळं फक्त शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मी केलं, त्यामागे कोणताही कट नव्हता, असं दिशाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *