Wed. Jun 3rd, 2020

निर्भयाच्या नराधमांना 1 फेब्रुवारीलाही फाशी नाहीच, दोषींच्या वकिलाचं निर्भयाच्या मातेला आव्हान

निर्भया बलात्कार (Nirbhaya Rape) प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा निश्चित केली होती. मात्र फाशीच्या अवघ्या 1 दिवस आधी चौघांच्याही फाशीला स्थगिती देण्याचे आदेश पटियाला कोर्टाने दिले आहेत.

1 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मुकेश सिंग, अक्षय ठाकूर, विनय शर्मा  आणि पवन गुप्ता यांना फाशी देण्यात येणार होती. त्यासाठीची सर्व प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. यापूर्वी अनेकदा दयायाचिका करूनही सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि राष्ट्रपतींनी याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे आधीही एकदा पुढे ढकललेली फाशीची शिक्षा 1 फेब्रुवारी रोजी नक्की मानली जात होती.

मात्र आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली आहे. जेल नियमावलीतील 836 नियमानुसार एकापेक्षा अधिक लोकांना देहान्ताची शिक्षा देताना कायद्याचे इतर पर्याय उपलब्ध असेपर्यंत फाशी देता येत नाही. तसंच हे आरोपी दहशतवादी नाहीत, असा युक्तिवाद दोषींच्या वकिलांनी मांडला. त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

दोषींच्या वकिलांचं निर्भयाच्या आईला आव्हान

निर्भयाच्या दोषींना कधीच फाशी होणार नाही, असं आव्हान दोषींचे वकील ए.पी. सिंह यांनी आपल्याला दिल्याचं निर्भयाच्या मातेने भावूक होऊन सांगितलं. तरीही आपण आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारला माझ्या दोषींना फाशी द्यावीच लागेल, असं निर्भयाच्या आईने म्हटलंय.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *