Mon. Aug 8th, 2022

नव्या वर्षाच्या स्वागताने ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ ची भरारी

कोरोना काळात मनोरंजनाची व्यासपीठे बदलत असताना नव्या ऊर्मीने दुबईत रंगणाऱ्या ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ या मराठी चित्रपटांच्या प्रीमियर सोहळ्याच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. आखाती देशातील चित्रपटप्रेमींना आनंद देण्यासाठी तसेच मराठी चित्रपटसृष्टी नव्या ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने सज्ज व्हावी या उद्देश्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी या सोहळ्याचे आयोजक असलेल्या ‘५ जी इंटरनॅशनल’ने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एका छोटेखानी समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते. दुबईत प्रीमियर होत असलेल्या तसेच इतरही मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तसेच विविध वाहिन्यांचे पत्रकार, मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत विविध कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.

मराठी चित्रपटाला ‘ग्लोबली कनेक्ट’ करण्याचा आयोजक सचिन कटारनवरे यांच्या प्रयत्नाला दाद देत त्यांच्या धाडसाचे कौतुक ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी याप्रसंगी केले. ‘५ जी इंटरनॅशनल’च्या वतीने आयोजित ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ या सोहळ्यात काही निवडक बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटांचे प्रीमियर शो संपन्न होणार आहेत. याखेरीज काही मराठी चित्रपटांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही सिनेचाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. २०२१ या नव्या वर्षात सातासमुद्रापार रंगणारा हा सोहळा मराठी चित्रपटांसाठी कमालीचा उत्साहवर्धक ठरेल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातील नियमावलीमुळे २० ते २३ जानेवारी दरम्यान दुबईत रंगणाऱ्या या नियोजित सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने पुढील तारखांची जुळवाजुळव सध्या सुरु असून लवकरच आयोजकांकडून त्याविषयीची पुढील माहिती कळविण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या या मान्यवर मंडळीनी आयोजक सचिन कटारनवरे यांच्या या अनोख्या कल्पनेला पाठिंबा दर्शवला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.