यंदा ग्यानबा तुकारामाचा जयघोष जोरात

गेली दोन वर्ष कोरोनाने सर्वांच्या घरापाशीच बस्तान ठोकले होते. त्यामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. तर राज्यातील सण-उस्तवांवरही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच सण-उत्सवही साजरे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची यंदाची आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. प्रशासन यांदाच्या वारीच्या कामाला लागले असून वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, यंदाची विठ्ठल वारी ही कोरोनानंतरच्या रेकॉर्डब्रेक गर्दीची असेल, असा दावा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरात केला आहे. शुक्रवारी सोलापूरात आषाढी यात्रेच्या संदर्भात आयोजित बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा पंढरपूरची आषाढी वारी निर्बंधमुक्त होणार आहे. कोरोना काळात गेली दोन वर्षे कोरोनामुळे विविध प्रकारची बंधनं या सोहळ्यावर आली होती. कधी एसटीने तर कधी वेगळ्या पद्धतीने संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. आता मात्र कोरोनाची सर्व बंधने रद्द केल्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवभाई एकत्र होतील.
यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा सर्व वारकऱ्यांना चालत पंढरपूरला जाऊन अनुभवता येणार आहे. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात आषाढी वारी संपन्न होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.