महापुरानंतर सांगलीतलं ‘हे’ घरं लटकतंय अधांतरी !

सांगलीच्या हरिपूरमध्ये महापुरामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. मात्र यामध्ये एका घराखालची अक्षरशः जमीन निघून गेली आहे. पाण्याचा वेग आणि जमिनीतील पेव यामुळे हरिपुरातील एक घर अक्षरशः लटकत आहे.
कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेल्या हरिपूर गावाने 2005 सालाचा महापूर पाहिला आणि अनुभवला आहे.
मात्र यंदाच्या वर्षी सर्वांचे अंदाज फेल जात भयंकर महापूर आला.
या महापुरात हरिपूर गावालाही आठ दिवस पाण्याने वेढा दिला होता.
या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.
मात्र हरिपूरच्या बोंद्रे गल्लीत राहणाऱ्या शेरीकर कुटुंबियांना पुरानंतर आपलं राहतं घर पाहून धक्का बसला.
पुराच्या पाण्यामुळे आणि पेवमुळे शेरीकर कुटुंबाच्या घराचा आधारच वाहून गेलाय.
त्यामुळे अक्षरशः एका भिंतीवर शेरीकर यांचं घर लटकलंय.
या घराच्या खालच्या बाजूला पेवाचा मोठा विहिरीएवढा खड्डा पडलाय. यामुळे हे घर कोणत्याही क्षणी पेवेच्या खड्ड्यात कोसळण्याची भीती आहे. त्यामुळं आपल्या कष्टाने बांधलेले घराची स्थिती पाहून शेरीकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.