Fri. Jun 18th, 2021

निलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले

कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निलंबित केले. त्यानंतर काही मोठ्या ब्रँड्सनेही हार्दिककडे पाठ फिरवली. हार्दिकच्या अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. निलंबनाच्या कारवाईनंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आहे आणि तो कोणाचे फोनही उचलत नाही, अशी माहिती हार्दिकचे वडील हिमांशु पांड्या यांनी दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले,”ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून त्याने घराबाहेर पाऊल टाकलेलं नाही. तो कोणाच्या फोनचेही उत्तर देत नाही. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला आणि आराम केला. गुजरातमध्ये सणाचं वातावरण आहे. क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे गेल्या काही वर्षांत कुटुंबीयांसोबत तो सण साजरा करू शकला नव्हता. मात्र आता तो घरी असूनही तो सण साजरा करत नाही.”

कॉफी विथ करण कार्यक्रमात हार्दिकसोबत लोकेश राहुलही होता आणि बीसीसीआयने या दोघांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारी बोलावले. हिमांशु पांड्या पुढे म्हणाले, हार्दिकला मकरसंक्रातीत पतंग उडवणे फार आवडते आणि यंदा त्याच्याकडे पतंग उडवण्यासाठी वेळही होता. मात्र सध्या प्रतिकुल परिस्थितीमुळे त्याने सण साजरा करणे टाळले. निलंबनाच्या कारवाईमुळे तो खूप निराश झाला आहे आणि त्याने त्या विधानाबद्दल माफीही मागितली आहे. या प्रकरणावर त्याच्याशी चर्चा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच आम्ही बीसीसीआयच्या निकालाची वाट पाहत आहोत. असेही हार्दिकचे वडिल म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *