अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला

अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील सुनावणी संपली असून मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. तसेच सीबीआयला तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. दोन महिन्यांच्या तपासाचा अहवाल उद्या सादर करण्यास उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करून घेणारे अधिकारी वाझे यांची पार्श्वभूमी आणि भूतकाळ आपल्याला माहीत नसल्याने आपण निर्दोष आहोत, असा दावा करू शकतात का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी केला. एखाद्याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या मुळाशी जायचे असेल तर ते देशमुखांच्यावतीने खंडणीचे पैसे वसूल करणाऱ्या सचिन वाझे याला पुन्हा सेवेत रुजू कोणी करून घेतले? वाझेचा भूतकाळ त्यांना माहीत नव्हता, असा दावा ते करू शकतात का? असा प्रश्न न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने केला.
कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडू नका. जोपर्यंत सर्व सुरळीत सुरू होते, तोपर्यंत कोणी बोलले नाही. जशी बदली करण्यात आली तसे आरोप करण्यात आले, असेही न्यायालयाने म्हटले. देशमुख यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. तसेच देशमुख यांच्या कारवाई स्थगित करण्याच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे.