Thu. Jan 20th, 2022

नितेश राणे अटकपूर्व जामीन अर्जावर १७ जानेवारीला सुनावणी

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी होणार आहे.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाही, तोवर त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असे राज्य शासनाने उच्च न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान राजकीय वैमन्यस्यातून आणि विधानभवनातील जुन्या प्रकरणावरून नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे.

नेमकं प्रकरण काय?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणामी नितेश राणे यांची चौकशी सुरू आहे.

संतोष परब हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांकडून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटकेपासून दिलासा मिळत आहे. आता नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १७ जानेवारी रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *