नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. नितेश राणे अज्ञातवासात असल्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. तर अटकपूर्व जामीनासाठी त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्यामुळे त्यांना अटक करता येणार नाही.
काय आहे प्रकरण?
१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणामी नितेश राणे यांची चौकशी सुरू आहे.
संतोष परब हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांकडून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली असून राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच या प्रतिज्ञापत्रावर अभ्यास करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी अटकपूर्व जामिन अर्जावर पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.