रायगडमध्ये संततधार! नागोठणे शहरात पूर
रायगड जिल्हयात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. सावित्री आणि अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

रायगड जिल्हयात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. सावित्री आणि अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात शिरल्याने तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नागोठणे शहरात पुराचे पाणी!
शहरातील एस. टी. स्टँड , बाजारपेठ , मोहल्ला , कोळीवाडा भागात 4 फुटांपर्यंत पाणी आहे . त्यामुळे तेथील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे .
पेणच्या अंतोर, अलिबागच्या रामराज गावातही पूराचे पाणी शिरले आहे. अंतोरे गावातील नागरीकांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
जिल्हयाच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. पाली पूलावर पाणी आल्याने वाकण ते खोपोली वाहतूक बंद आहे .
सावित्री नदीवरील दादली पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता तो आता सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर धामणदिवी येथे पहाटे दरड कोसळली होती ती बाजूला करण्यात आली असून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे .