अभिनेत्री हेमांगी कवी हिचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने तिच्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. एवढचं नव्हे तर हेमांगी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून समाजिक मुद्दे मांडणं असो किंवा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देणं यात ती कधीही मागे हटत नाही. नुकतच हेमांगीला एका व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत हेमांगीने या नेटकऱ्यांची बोलती बंद केली होती.
स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसचं अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलचं सुनावलं होतं. त्यानंतर हेमांगीने फेसबुकवरदेखील एक पोस्ट शेअर करत समाजात स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर वाचा फोडली आहे. स्त्रीयांना त्यांच्याच शारिरीक स्वातंत्र्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षावर हेमांगीने तिचं बेधडक मत मांडलं आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे.
“बाई, बुब्स आणि ब्रा” या शिर्षकाखाली तिने ही पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, “ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या प्रतिमेचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!”