Thu. Dec 2nd, 2021

तालिबानचा कंदाहारवर ताबा

अफगाणिस्तानमधील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातले महत्त्वाचे प्रदेश ताब्यात घेतल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हेरात प्रांताचे संपूर्ण सरकार तालिबानला शरण गेले आहे. तर राज्याचे गव्हर्नर, पोलीस प्रमुख, एनडीएस कार्यालयाचे प्रमुख यांना तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय तालिबानविरोधातील युद्धात प्रमुख असणाऱ्या मोहम्मद इस्माईल खानलाही तालिबानने ताब्यात घेतले आहे. टोलो न्यूजने आपल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे.

त्याआधी तालिबान्यांनी आता काबुलपासून ९० किलोमीटरवर असलेल्या लोगार प्रांतावरही ताबा मिळवला आहे. आतापर्यंत लोगरसमवेत १५ महत्त्वाच्या ठिकाणांवर तालिबानने ताबा मिळवला आहे. लोगार प्रांत ताब्यात घेतल्यानंतर तालिबान आता काबूलपासून केवळ ९० किलोमीटर दूर आहे. काही तासांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानची दोन मोठी शहरे कंदाहार आणि हेरात ताब्यात घेतली. अफगाणिस्तानवर तालिबानच्या हल्ल्याने देशाचा दोन तृतीयांश भाग काबीज केला आहे, तर अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार ९० दिवसांत तालिबान अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतो.

दरम्यान, अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे आणि तालिबानची पकड मजबूत झाल्यामुळे अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिका तालिबानचा सामना करण्यासाठी नाही तर अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचारी, नागरिक आणि विशेष व्हिसा अर्जदारांना तेथून बाहेर काढण्यासाठी ३००० पेक्षा जास्त सैन्य पाठवणार आहे. हे सैनिक काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असतील. हे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांच्या परत येण्यास मदत करेल आणि त्यांना विमान सुविधा आणि सुरक्षा प्रदान करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *