Jaimaharashtra news

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू;ड्रोनच्या सहाय्यानं दहशतवादी हल्ल्याची शक्यता

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचण्याचा विचार करीत आहेत. याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या सहाय्याने देशाच्या राजधानीला हादरवून टाकण्याचा कट असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी दोन अँटी ड्रोन सिस्टमचा वापर करण्यात आला होता, मात्र यंदा चार अँटी ड्रोन सिस्टम लाल किल्ल्यावर लावण्यात येणार आहेत.
५ ऑगस्ट रोजी जम्मू – काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आला होता. त्यामुळे यंदा याच तारखेला हल्ल्याची दाट शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून वर्तवण्यात येत आहे.

एकीकडे एजन्सींने इशारा दिला असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली पोलीस आणि इतर राज्यांतील पोलिसांना ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्या प्रशिक्षणात सामान्य ड्रोन पाहिल्यास कारवाई कशी करावी हे शिकवले गेले आहे, तर दुसऱ्या प्रशिक्षणामध्ये एखादे संशयास्पद ड्रोन किंवा उड्डाण करणारे उपकरण दिसले तर त्यावर कारवाई कशी करावी, हे शिकवण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असताना दिल्ली पोलिसांनी उड्डाण करणाऱ्या सर्व उपकरणांवर बंदी घातली आहे. असामाजिक घटक आणि दहशतवाद्यांची धमकी लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

Exit mobile version