दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटातील बालकलाकारांवर अश्लील चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपट ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट वादात सापडला आहे. गिरणी कामगार चळवळीची वाताहत होण्याचा आधारावर हा चित्रपट असून या चित्रपटाचा ट्रेलर अश्लील असल्याचा दावा महिला आयोगाने केला आहे. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाचा ट्रेलरही हटवण्यात आला आहे. याविरोधात पोलिसांत पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. तसेच याप्रकरणी तपासात पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे मांजरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे.
महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये अश्लील दृश्य दाखवण्यात आली असून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. तर ट्रेलरमधील आक्षेपार्ह विधान, दृश्य वगळण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.