Mon. Sep 20th, 2021

कमल हासनला गांधींकडे पोहोचवण्याची तयारी केली जाईल- हिंदू महासभा

तामिळ सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार आणि ‘मक्कळ निधी मय्यम’ पक्षाचे संस्थापक नेते कमल हासन यांनी नथूराम गोडसेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण तापू लागलंय. नथूराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी असून तो हिंदू होता, असं वक्तव्य कमल हासन यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांना अनेक धमक्या येऊ लागल्या आहेत.

नथूराम हिंदूंसाठी कायम आदर्शवत!”- अभिषेक अग्रवाल

हिंदू महासभा कमल हासन यांच्या वक्तव्यामुळे आक्रमक झाली आहे.

नथूराम गोडसेंना दहशतवादी संबोधणारे हिंदूंच्या नावावर कलंक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कमल हसन यांना गांधींकडे पोहोचवण्याची तयारी केली जाईल, असा धमकीवजा इशाराही अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी मेरठ येथे केलंय..

जर कमल हासन हे सवंग प्रसिद्धीसाठी नथूराम गोडसेंना दहशतवादी म्हणत असतील, तर कमल हसन हे स्वतःच आपल्या मृत्यूला जबाबदार असतील असं विधान अग्रवाल यांनी केलंय.

नथूराम गोडसे हिंदूंसाठी कायम आदर्शवत आहेत आणि राहतील, असंही अग्रवाल यावेळी म्हणाले.

दहशतवाद्यांना आश्रय फारूख अब्दुल्ला, नवज्योतसिंह सिद्धू, मेहबूबा मुफ्ती यांच्यासारखे लोकच देतात असा उलटा आरोप त्यांनी केला.

 

नथुराम गोडसे भारताचे पहिले हिंदू दहशतवादी; कमल हसन यांचे वादग्रस्त विधान

 

काय म्हणाले होते कमल हासन?

कमल हसन यांनी चेन्नई येथे एका प्रचारसभेदरम्यान नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी असून तो हिंदू होता, असं म्हटलं होते.

या वक्तव्याबद्दल देशभरातून कमल हासन यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय यानेदेखील टीका करताना ‘ज्याप्रमाणे कलाकाराला धर्म नसतो, त्याप्रमाणे दहशतवादाला धर्म नसतो, अशावेळी आपण केवळ मुस्लिमबहुल विभागात असल्यामुळे तुम्ही हिंदू शब्द जाणीवपूर्वक बोललात का?’ असा सवाल केला.

तामिळनाडूचे दुग्धोत्पादन मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनीही ‘कमल हसन यांची जीभ छाटा’, असं विधान केलं. त्याचप्रमाणे मक्कळ निधी मय्यम पक्षावर हिंसाचार पसरवण्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी देखील केली. त्यानंतर हिंदू महासभेने आज कमल हासन यांना धमकी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *