‘येथे’ चक्क स्मशानात साजरी होते होळी!

मानवी शरीराला हानिकारक असलेल्या गुटखा, सिगरेट, तंबाखूच्या व्यसनाने आजची तरुण पिढी पोखरून काढली आहे. सामाजिक आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या या व्यसनाचं निर्मूलन व्हावं, या उद्देशाने वाशीम येथील ‘संकल्प फाउंडेशन’च्या वतीने ‘स्मशान होलिकोत्सव’ साजरा करण्यात येतो. येथील ‘मोक्षधाम’ स्मशानभूमीत होळी पेटविण्यात येऊन त्यामध्ये गुटखा, तंबाखू, सिगरेट यासह प्लास्टिक पिशव्यांचे दहन यावेळी करण्यात येतं.
आपल्यातील तमोगुणाचे प्रतीकात्मक दहन म्हणजेच होळी वाशीम येथील ‘संकल्प फाउंडेशन’च्या वतीने हाच होलिकोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. देशाचं भविष्य असलेल्या आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावं हा संदेश देण्यासाठी स्मशानात होळी पेटविण्यात येते. त्यात गुटखा, सिगरेट, तंबाखू तसंच पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे दहन यावेळी करण्यात आलं.
फाउंडेशनच्या वतीने स्मशानभूमीत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहीद दिनाचंही औचित्य साधून स्वातंत्र्याकरिता बलिदान देणाऱ्या स्व. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू याच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं आणि त्यांना अभिवादन करण्यात आलं.