Sat. Nov 27th, 2021

‘येथे’ स्मशानात खेळतात धुळवड, ते ही चितेच्या भस्माची उधळण करत!

होळी आणि धुळवड म्हणजे रंगांची उधळण, धम्माल आणि आनंद… ओले रंग, कोरडे रंग अशा विविध रंगांच्या प्रकाराने एकमेकांना पुरतं रंगीबेरंगी करण्यात सगळ्यांनाच खूप मजा येते. मथुरेतील होळी आणि धुळवडदेखील खूप प्रसिद्ध आहे. पण काशीनगरीत मात्र जी धुळवड खेळली जाते, ती मात्र तुम्हाला घाबरवू शकते. काशीच्या मणिकर्णिका घाटावर चक्क चिताभस्माने होळी खेळली जाते.

फाल्गुन एकादशीला काशीमध्ये बाबा विश्वनाथाची पालखी निघते. तेव्हा लोक रंग उधळत असतात. भगवान शंकरांनी पार्वतीला विवाह करून जेव्हा काशीत आणलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी स्मशानात जळत्या चितांच्या मध्ये चिताभस्माने खेळत शंकरांनी धुळवड साजरी केली, अशी मान्यता आहे. म्हणून दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी डमरूंच्या नादात हर हर महादेव अशी गर्जना करत विविध आखाड्यातील साधू पान आणि थंडाईचं सेवन करत मणिकर्णिका घाटावरील चिताभस्माने रंग खेळतात

आख्यायिकेनुसार भगवान शंकर अजूनही या स्मशान वास करून रंग खेळतात. मात्र ते रंगांची धळण करण्याऐवजी चितेचं भस्म उधळून आपल्या भक्तांना पवित्र करतात. तारक मंत्र देऊन महादेव आपल्या भक्तांवर चिताभस्माप्रमाणे कृपेचाही वर्षाव करतात, अशी येथे श्रद्धा आहे. त्यामुळे स्मशानात होळी खेळण्याची येथे प्रथा आहे.

अनेक लोक बाहेरून या होळीत सहभागी होण्यासाठी येतात. तर अनेकांना स्मशानात सण साजरा करणं आणि अंगाला चितेची राख उडवणं भयप्रद वाटतं. अशी प्रथा इतर कुठेही साजरी होत नाही. जगातील सर्वांत जुनी आणि अव्याहतपणे लोकवस्ती असणारी काशीनगरी मात्र याला अपवाद आहे. या ठिकाणी एकमेकांना भस्म लावत होळी साजरी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *