Tuesday, November 11, 2025 10:51:09 PM

Mumbai Crime News : मुंबईत सायबर गुन्हा उघड; 'मनी हाइस्ट' स्टाईलने उद्योजकाकडून तब्बल 58 कोटींची लूट

एका नामांकित 72 वर्षीय उद्योजकाला 'डिजिटल अटक' (Digital Arrest) या नव्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून तब्बल 58 कोटी रुपये गमवावे लागले आहेत.

mumbai crime news  मुंबईत सायबर गुन्हा उघड मनी हाइस्ट स्टाईलने उद्योजकाकडून तब्बल 58 कोटींची लूट

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला एका मोठ्या सायबर गुन्ह्याच्या घटनेने हादरवून टाकले आहे. एका नामांकित 72 वर्षीय उद्योजकाला 'डिजिटल अटक' (Digital Arrest) या नव्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून तब्बल 58 कोटी रुपये गमवावे लागले आहेत. हे आतापर्यंत देशातील सर्वात मोठं डिजिटल अरेस्टचं प्रकरण मानलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्ती मुंबईतील प्रसिद्ध स्टॉक ब्रोकर असून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचं सांगणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांनी निशाण्यावर घेतलं. इतकंच नाही, तर आरोपींनी व्हिडिओ कॉलद्वारे सरकारी अधिकारी असल्याचा बनावट आव आणला. त्यांनी मनी लॉंड्रिंद प्रकरणात अडकल्याचं सांगत दाम्पत्याला डिजिटल पद्धतीने 'अटक' केली. चौकशी आणि कारवाईच्या भीतीने पीडित उद्योजकाने वेगवेगळ्या राज्यांतील 18 बॅंक खात्यांमध्ये 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले. 

हेही वाचा: Sachin Tendulkar News : सचिन तेंडुलकरने 'या' कंपनीत पैसे गुंतवल्याच्या अफवांमुळे शेअरमध्ये 13000 टक्क्यांची वाढ; अधिकृत स्पष्टीकरण समोर

यादरम्यान, आरोपींनी खोटे ईडी आणि सीबीआय ओळखपत्र दाखवत व्हिडिओ कॉलवर सरकारी कागदपत्रं दाखवली आणि सर्व मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली. त्यामुळे, घाबरलेल्या तक्रारदाराने आपली संपत्ती वाचवण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार पैसे पाठवले. या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून तीन आरोपींंना अटक केली आहे. यादरम्यान, तपासात समोर झालं की प्रत्येक आरोपीच्या खात्यात 25 लाख रुपये जमा झाले होते. पोलिसांच्या मते, या टोळीचं जाळं केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही पसरलेलं असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे, सायबर सुरक्षेबाबत चिंता वाढली असून अशा प्रकारच्या कॉल्सपासून आणि मेसेजेसपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा कॉल आला तरी त्यांची ओळख खात्रीशीर तपासा आणि पैसे ट्रान्सफर करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री