Friday, March 13, 2026 06:46:41 AM

Nitin Gadkari: गडचिरोली होणार आता देशाची 'स्टील राजधानी'; नितीन गडकरींनी मांडला साडेसात लाख कोटींच्या गुंतवणुकीचा 'रोडमॅप'

मिहानचा विस्तार, नागपूर गॅस पाइपलाइन आणि पर्यटन क्षेत्रातील वाढ यामुळे विदर्भ विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.

nitin gadkari गडचिरोली होणार आता देशाची स्टील राजधानी नितीन गडकरींनी मांडला साडेसात लाख कोटींच्या गुंतवणुकीचा रोडमॅप

नागपूर: एकेकाळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बालमृत्यूंच्या विदारक वास्तवामुळे चर्चेत असलेला विदर्भ आता विकासाची नवी क्षितिजे पादाक्रांत करत आहे. "माओवादाची राजधानी अशी ओळख पुसून गडचिरोली आज देशाचे 'स्टील हब' म्हणून नावारूपास येत आहे. तब्बल साडेसात लाख कोटींची गुंतवणूक आणि वाघांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यटन क्षेत्रात झालेली भरभराट, हे विदर्भाच्या परिवर्तनाचे द्योतक आहे," असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित 'ॲडव्हांटेज विदर्भ' या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते.

विदर्भाच्या बदलत्या चित्राचे वर्णन करताना गडकरी म्हणाले की, "दहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कुपोषणामुळे अडीच हजार मुलांचा मृत्यू, या वेदनादायी परिस्थितीतून विदर्भाला बाहेर काढण्याच्या ध्येयाने हा प्रवास सुरू झाला. आज पाच वर्षांनंतर गडचिरोलीतील मुले शिक्षणासाठी चक्क ऑस्ट्रेलियाला जात आहेत, ही कल्पना पूर्वी कुणी मांडली असती तर ती हास्यास्पद वाटली असती. मात्र, आज हे सत्य परिस्थिती आहे." या बदलाचा वेग इतका प्रचंड आहे की, येत्या तीन वर्षांत नागपुरातील प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा होणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच औद्योगिक विस्तारालाही मोठी गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहान प्रकल्पाच्या विस्तारास मंजुरी दिली असून, लवकरच अतिरिक्त 10 हजार एकर जागेवर मिहानचा विस्तार होणार आहे. ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ हे केवळ राजकीय व्यासपीठ नसून, तो विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आणि परिवर्तनाचा दृष्टीकोन मांडणारा मंच असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. केवळ उद्योगच नव्हे, तर विदर्भातील व्याघ्र पर्यटनानेही मोठी झेप घेतली असून, वाघांची संख्या इतकी वाढली आहे की, आता त्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतरित करावे लागत आहे.

हेही वाचा: Stock Market Today:शेअर बाजारात आज चांदी? 'या' कंपनीच्या नफ्यात 90 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, होणार का मोठी कमाई?

या महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भात मोठ्या गुंतवणुकीचे दरवाजे खुले झाले आहेत. सुनील फेरो अँड इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड विदर्भात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे दीड हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

याशिवाय, पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 'आरोह हॉस्पिटॅलिटी' आणि 'महिंद्रा सिग्नेचर' यांच्यात ताडोबा आणि पेंच येथे पंचतारांकित रिसॉर्ट उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांच्या संशोधनाला बळ मिळत असून, 22 विद्यार्थ्यांच्या पेटंट्सला साडेपाच कोटींचे फंडिंग मिळाल्याची माहिती एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली.

एकूणच, 'ॲडव्हांटेज विदर्भ' हे केवळ एक प्रदर्शन ठरले नाही, तर तो विदर्भाच्या आर्थिक स्वावलंबनाचा पाया ठरला आहे. गडचिरोलीचे 'स्टील हब' होणे आणि नागपूरचा औद्योगिक विस्तार ही विदर्भाच्या प्रगतीची नांदी आहे. गडकरींनी मांडलेले हे विकासाचे व्हिजन जर याच गतीने प्रत्यक्षात उतरले, तर येणाऱ्या काळात विदर्भ केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे एक प्रमुख 'इंडस्ट्रिअल इंजिन' म्हणून ओळखले जाईल, यात शंका नाही.

हेही वाचा: Matheran e-Rikshwa News : मोठी बातमी! माथेरानमध्ये उद्यापासून इ-रिक्षा चालकांचा संप, स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी


सम्बन्धित सामग्री