सातारा जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या अपहरण प्रकरणात शिरवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका 35 वर्षीय तरुणाला जाळ्यात ओढत, त्याला वीर धरण परिसरात बोलावून बेदम मारहाण केल्याच्या गुन्ह्यात मनसेच्या खंडाळा तालुकाध्यक्षासह तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे खंडाळा तालुक्यात राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी प्रथम सोशल मीडियावर महिला असल्याचे भासवत तरुणाशी चॅटिंग सुरू केली. त्याच्यावर विश्वास बसताच 20 ऑक्टोबर रोजी वीर धरण परिसरात भेटण्याचे आमिष दाखवले. मात्र, प्रत्यक्षात ठिकाणी पोहोचताच संशयितांनी त्याला त्याच्याच कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि अपहरण करून मारहाणीचा सत्र सुरू केला. काठीने तरुणाला बेदम मारहाण केली गेल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांची ओळख अशी, इरफान दिलावर शेख, मनसे खंडाळा तालुकाध्यक्ष विशाल महादेव जाधव, शिरवळ रहिवासी, पूर्वी तडीपार असेलेला किरण प्रकाश मोरे, कथित युट्यूब पत्रकार जखमी तरुणाने शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक तयार करत तिघांना जेरबंद केले. न्यायालयानेही तिघांना पोलिस कोठडी सुनावल्याने प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: Rupali Thombare Patil : बहिणीच्या प्रकरणावरून वाद पोलीस ठाण्यात; रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राजकीय प्रवास कठीण वळणावर
विशेष गोष्ट म्हणजे, या प्रकरणात अडकलेला आरोपी किरण मोरे याच्यावर यापूर्वीही विनयभंग, मारहाण, धमकी आणि आयटी कायद्या अंतर्गत तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या असामाजिक कारवायांवर आळा घालण्यासाठी शिरवळ पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. सुनावणी झाल्यानंतर वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी त्याला पुणे आणि सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश जारी केला. विशाल खांबे (डीवायएसपी, फलटण) यांच्या सूचनेनुसार आणि शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणामुळे साताऱ्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली आहे. सध्या तिघेही आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. बनावट महिला प्रोफाइलच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे वाढते प्रकार पाहता पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची काळजी वाढली; योजनेची 'ही' पूर्तता लवकर करा, अन्यथा पैसे मिळणे होईल बंद?