Thursday, March 12, 2026 10:26:44 PM

Delhi On High Alert: धक्कादायक! दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट; लष्कर-ए-तोयबाच्या रडारवर लाल किल्ला आणि मोठी मंदिरे

संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

delhi on high alert धक्कादायक दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट लष्कर-ए-तोयबाच्या रडारवर लाल किल्ला आणि मोठी मंदिरे

नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. विशेषतः लाल किल्ला (Red Fort) परिसर आणि चांदणी चौक (Chandni Chowk) भागात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात कडक करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका प्रमुख मंदिरासह गर्दीच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) भारतात आयईडी स्फोट (Improvised Explosive Device, IED) घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य मोठा हल्ला घडवण्याचा कट रचला जात असल्याने केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हा धोका 6 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथील मशिदीत झालेल्या भीषण स्फोटाशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: T20 World Cup Super-8 : सुपर-8 मध्ये एखादा सामना पावसात वाहून गेला तर कोणाचे होणार नुकसान? नेमका काय आहे नियम, जाणून घ्या

दिल्लीतील प्रमुख धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिस व सुरक्षा दलांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे. विशेषतः गर्दीच्या मंदिर परिसरांवर आणि पर्यटनस्थळांवर सीसीटीव्ही देखरेख (CCTV Surveillance) वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2025 मध्ये लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ (Red Fort Metro Station) झालेल्या कार स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 24 जण जखमी झाले होते. स्फोटकांनी भरलेली कार अचानक उडाल्याने परिसरातील अनेक वाहनांना आग लागली होती.

तपासादरम्यान डीएनए चाचणीद्वारे (DNA Test) वाहन चालवणारा उमर मोहम्मद उर्फ उमर उन नबी असल्याचे समोर आले होते. फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाशी संबंधित असलेल्या या आरोपीने सहकाऱ्यांच्या अटकेनंतर घाबरून स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. याच दिवशी हरियाणातील फरीदाबाद परिसरातून सुमारे 2,900 किलो स्फोटक साहित्य, ज्यामध्ये अमोनियम नायट्रेटचा समावेश होता, जप्त करण्यात आले होते.

सध्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: Gokul Milk Price Hike : सामान्यांना दिलासा नाहीच! अमूलपाठोपाठ गोकुळनेही केली दुधाच्या किंमतीत वाढ, लीटरमागे तब्बल...


सम्बन्धित सामग्री