Tuesday, March 17, 2026 02:15:29 PM

DGCA New Rules: वैमानिकांसाठी 12 तासांचा नवा नियम काय आहे? दारू पिऊन विमान उडवणाऱ्यांना आता थेट जेल की निलंबन?

डीजीसीएने पायलटांसाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणीचे नियम कडक करत तीन वेळा पॉझिटिव्ह आढळल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद केली आहे.

dgca new rules वैमानिकांसाठी 12 तासांचा नवा नियम काय आहे दारू पिऊन विमान उडवणाऱ्यांना आता थेट जेल की निलंबन

नवी दिल्ली: नागरिक विमान सेवा क्षेत्रात उड्डाण सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी Directorate General of Civil Aviation (DGCA) ने पायलटांसाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणीचे नियम अधिक कठोर केले आहेत. सुधारित नियम 9 फेब्रुवारीपासून लागू झाले असून, वारंवार नियमभंग करणाऱ्या पायलटांचे परवाने रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. उड्डाण सुरक्षितता ही केवळ रक्तातील अल्कोहोलच्या पातळीवर अवलंबून नसून, एकूण शारीरिक व मानसिक क्षमतेवरही परिणाम होत असल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

नवीन नियमांनुसार, एखादा पायलट उड्डाणापूर्वी तीन वेळा ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल. तसेच भारतात उड्डाण करणाऱ्या विदेशी पायलटांची FATA (Foreign Aircrew Temporary Authorization) परवानगीही रद्द केली जाईल, आणि अशा प्रकरणांत त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे परदेशी आणि देशांतर्गत सर्व पायलटांवर समान कडक अंमलबजावणी होणार आहे.

पहिल्यांदा किरकोळ प्रमाणात पॉझिटिव्ह आढळल्यास, म्हणजे 0.009 टक्के BAC (Blood Alcohol Content) किंवा त्यापर्यंतची नोंद असल्यास, संबंधित क्रू सदस्याला तात्काळ ड्युटी रोस्टरमधून हटवून समुपदेशनासाठी पाठवले जाईल. नियोजित विमानसेवांच्या बाबतीत हे समुपदेशन मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि उड्डाण सुरक्षा प्रमुख यांच्या देखरेखीखाली होईल. इतर ऑपरेटरच्या बाबतीत ही जबाबदारी जबाबदार व्यवस्थापक आणि उड्डाण सुरक्षा प्रमुख यांच्याकडे असेल. अशा सर्व घटनांची माहिती डीजीसीएला देणे बंधनकारक राहील, मात्र ती परवान्यावर नोंदवली जाणार नाही.

हेही वाचा: Anand Sagar death: भारतीय दूरचित्रवाणीतील एक युग संपले: रामायणचे वारसदार आनंद सागर यांचे 84व्या वर्षी निधन

दुसऱ्यांदा प्री-फ्लाइट चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास, किंवा एकदा पॉझिटिव्ह आणि दुसऱ्यांदा चाचणी टाळल्यास, संबंधित पायलटचा परवाना निलंबित केला जाईल. पोस्ट फ्लाइट चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास किंवा चाचणी न दिल्यास तीन वर्षांपर्यंत परवाना अथवा मान्यता निलंबित केली जाऊ शकते. डीजीसीएने स्पष्ट केले आहे की उड्डाणापूर्वी किमान 12 तास मद्यपानापासून दूर राहणे बंधनकारक आहे. ‘हँगओव्हर’मुळे क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, जरी रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण शून्य असले तरी. विशेषतः जड मद्यपानाचे परिणाम 48 ते 72 तास टिकू शकतात.

विदेशातून येणाऱ्या उड्डाणांसाठीही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. भारतात लँडिंगनंतर हे नियम लागू होतील. जे विमान भारतात ट्रांझिट करतात, त्यांच्यासाठी प्रस्थानस्थळी प्री-फ्लाइट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे ऑपरेटरसाठी बंधनकारक असेल. जर एखाद्या क्रू सदस्याने प्री-फ्लाइट चाचणी न देता उड्डाण केले असेल, तर पहिल्या लँडिंग पोर्टवर पोस्ट-फ्लाइट चाचणी करणे आवश्यक राहील. अहवाल निगेटिव्ह आल्यास पुढील उड्डाणास परवानगी दिली जाऊ शकते आणि याची माहिती डीजीसीएला देणे आवश्यक असेल.या कठोर नियमांमुळे उड्डाण सुरक्षेच्या मानकांमध्ये अधिक काटेकोरपणा येणार असून, प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: AI Dot Com: 300 रुपये गुंतवले आणि मिळाले 634 कोटी; हौसेपोटी खरेदी केलेले डोमेन ठरले 'सोन्याचे' अंडे देणारी कोंबडी, कोण आहे ती नशिबवान व्यक्ति


सम्बन्धित सामग्री