नवी दिल्ली: युनायटेड किंग्डमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ट्रम्प टॅरिफ प्रकरणावर भारताच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. एनडीटीव्ही वलर्ड समिट 2025 मध्ये बोलताना सुनक म्हणाले की, 'प्रत्येक देश आपल्या राष्ट्रीय हितासाठी काम करतो आणि भारताने ज्या प्रकारे अमेरिकन टॅरिफ परिस्थिती हाताळली ती योग्य आणि संतुलित पद्धत आहे'.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारतीय वस्तूंवरील टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवले, ज्यामुळे नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील संबंधांमध्ये ताण निर्माण झाला होता. तरीही सुनक यांच्या मते भारताने हा प्रश्न शांत आणि धोरणात्मक रीतीने हाताळला आहे.
हेही वाचा: Avalanche Hits Badrinath: बद्रीनाथजवळ हिमस्खलन! कुबेर भंडार हिमनदीचा काही भाग कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही
ऋषी सुनक काय म्हणाले?
'जग अधिक संरक्षणवादी होत आहे, पण भारताने युकेसोबत मुक्त व्यापार करार (FTA) करून जागतिक स्तरावर सकारात्मक संदेश दिला आहे', अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली. यादरम्यान, सुनक यांनी भारत-युके कराराला 'भविष्यातील आर्थिक सहकार्याचा पाया' असंही म्हटले.
पुढे सुनक म्हणाले की, 'युके आणि भारतातील नवीन व्यापार संबंध केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्यालाही बळ देतील. तसेच, पंतप्रधान मोदी यूकेला भेट देत आहेत आणि यूकेचे पंतप्रधान भारतात येणार आहेत. हे दोन्ही देशांमधील विश्वास आणि सहकार्याचे चिन्ह आहे', असं सुनक म्हणाले.
यादरम्यान, ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले की, 'व्यवहारांपेक्षा विश्वासावर आधारित संबंध अधिक टिकाऊ असतात'. तसेच, भारताच्या धौरणात्मक दृष्टिकोनाचे कौतुक करताना सुनक म्हणाले की, 'भारताने जगाला दाखवले की संवाद आणि सहकार्याद्वारेच व्यापारातील तणाव मिटवता येतात'.