India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट संघर्षाचा नवा अध्याय लवकरच सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी 'अ' (India A) and 19-वर्षांखालील (U-19) संघांच्या मालिकेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा भारताचा युवा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळल्या असून, त्याला या मालिकेत आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
'इंडिया ए' आणि 'ऑस्ट्रेलिया ए' यांच्यात रंगणार कसोटी व एकदिवसीय मालिका
सप्टेंबर ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत 'India A' आणि 'Australia A' या दोन बलाढ्य संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. ही मालिका पुद्दुचेरी येथे आयोजित करण्यात आली असून, यामध्ये दोन 4-दिवसीय कसोटी सामने आणि तीन 'लिस्ट ए' (एकदिवसीय) सामने खेळले जाणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी पहिल्या कसोटीने या मोहिमेला सुरुवात होईल, तर 11 ऑक्टोबर रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जाईल.
19-वर्षांखालील मालिकेत वैभव सूर्यवंशीवर मदार
याच दौऱ्याचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलियाचा 19-वर्षांखालील संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. राजकोट आणि अहमदाबाद येथे ही मालिका 18 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान पार पडेल. या मालिकेत 50 षटकांचे तीन सामने आणि दोन 4-दिवसीय सामने खेळले जातील. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने धमाका करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला याच संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी वैभवसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीची रंगीत तालीम
ही मालिका केवळ युवा खेळाडूंसाठीच नव्हे, तर वरिष्ठ संघासाठीही महत्त्वाची आहे. पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'पूर्वी ऑस्ट्रेलियाचा 'ए' संघ भारतात येत आहे. याद्वारे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतातील खेळपट्ट्यांचा आणि हवामानाचा अंदाज घेता येईल. या मालिकेत सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्वीनी आणि टॉड मर्फी यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडेही निवड समितीचे लक्ष असेल. बॉर्डर-गावस्कर चषकाची सुरुवात 21 जानेवारी रोजी होणार असून ती 'जागतिक कसोटी अजिंक्यपद' (WTC) स्पर्धेच्या दृष्टीने निर्णायक ठरेल.
हेही वाचा - Shreyas Iyer: 'आता हे अति होतंय'; पंजाबच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा संताप; भर मैदानात फिल्डर्सना झापलं
ऑस्ट्रेलिया 'अ' पुरुष संघाचा भारत दौरा (वेळापत्रक):
22–25 सप्टेंबर: पहिला 4-दिवसीय सामना, पुदुच्चेरी
6 ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पुदुच्चेरी
9 ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, पुदुच्चेरी
11 ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, पुदुच्चेरी
ऑस्ट्रेलिया 19-वर्षांखालील (U19) संघाचा भारत दौरा (वेळापत्रक):
18 सप्टेंबर: पहिला एकदिवसीय सामना, राजकोट
21 सप्टेंबर: दुसरा एकदिवसीय सामना, राजकोट
23 सप्टेंबर: तिसरा एकदिवसीय सामना, राजकोट
27–30 सप्टेंबर: पहिला 4-दिवसीय सामना, राजकोट
5–8 ऑक्टोबर: दुसरा 4-दिवसीय सामना, अहमदाबाद