राजकोट: भारताने आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 116 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. भारतीय संघासाठी जेमिमा रॉड्रिग्जनेआपल्या कारकिर्दीतील पाहिलं आंतरराष्ट्रीय शतक (102 धावा, 91 चेंडू) झळकावत संघाच्या विजयी वाटचालीत मोलाची भूमिका बजावली. राजकोटच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारताने 370/5 अशी आपली सर्वोच्च ODI धावसंख्या उभारली. जेमिमासह टॉप ऑर्डरमधील हरलीन देओल (89 धावा, 84 चेंडू), स्मृती मंधाना (73 धावा, 54 चेंडू), आणि प्रतिका रावळ (67 धावा, 61 चेंडू) यांनीही अर्धशतकी खेळी करत योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल, आयर्लंडचा डाव सुरुवातीपासूनच दबावाखाली राहिला. कूल्टर रिलीने 113 चेंडूत 80 धावा करत प्रतिकार केला, परंतु ती बाद झाल्यानंतर (41व्या षटकात), आयर्लंडच्या खालच्या फळीने थोड्या धावा केल्या पण पराभव टाळू शकले नाहीत. भारताच्या फिरकी जोडीने, दीप्ती शर्मा (3/37) आणि प्रिया मिश्रा (2/53), भेदक गोलंदाजी करत आयर्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. दीप्तीने आपल्या 100व्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी केली. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी 21 अतिरिक्त धावा दिल्या, तसेच आयर्लंडने ही त्यांच्या गोलंदाजी दरम्यान 25 अतिरिक्त धावा दिल्या होत्या.
या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 15 जानेवारी, बुधवार रोजी राजकोट येथेच खेळला जाईल.
संक्षिप्त धावफलक:
भारत: 370/5, 50 षटकांत (जेमिमा रॉड्रिग्ज 102, हरलीन देओल 89, स्मृती मंधाना 73)
आयर्लंड: 254/7, 50 षटकांत (कूल्टर रिली 80; दीप्ती शर्मा 3/37, प्रिया मिश्रा 2/53)
भारत 116 धावांनी विजयी.