प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आता ब्रेस्ट इम्प्लांट आणि प्लास्टिक सर्जरीवर कडक बंदी घातली आहे. या देशाने पाश्चात्त्य कपडे किंवा हेअरस्टाईल यांसारख्या रोजच्या जीवनातील लहान-सहान गोष्टींवर याआधीच कठोर नियम लागू केले आहेत. अशा प्रकारच्या कडक नियमांसाठी हा देश आधीपासूनच ओळखला जातो. आता 'किम' सरकारने सौंदर्य वाढवणाऱ्या शस्त्रक्रिया आणि ब्रेस्ट इम्प्लांट्सच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल एका डॉक्टरसह दोन महिलांवर सार्वजनिक खटला (Public Trial) चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेस्ट इम्प्लांट 'अ-समाजवादी' काम
उत्तर कोरियामध्ये ब्रेस्ट इम्प्लांटला 'अ-समाजवादी काम' (Non-socialist work) मानले गेले आहे आणि त्यावर कायद्याने बंदी आहे. अलीकडच्या घडामोडींनुसार, किम जोंग उन यांचे सरकार आता अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी मोहल्ल्यांमध्ये गस्त आणि गुप्तचर यंत्रणांचा वापर करत आहे. ज्या महिलांनी ही शस्त्रक्रिया केली आहे, त्यांची ओळख पटवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. जर एखाद्या महिलेने शरीरात कोणताही बदल केला असेल, तर नेत्यांना ही बाब पोलिसांना कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा - Russia v/s Ukraine War: रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला; शॉस्टका रेल्वे स्थानकावर 30 प्रवासी ठार
डॉक्टर आणि दोन महिलांवर सार्वजनिक खटला
सप्टेंबर महिन्याच्या मध्यात दक्षिण उत्तरी ह्वांगहे प्रांतातील सारिवॉन जिल्ह्यातील सांस्कृतिक हॉलमध्ये एका डॉक्टरवर आणि अवैध ब्रेस्ट सर्जरी करणाऱ्या महिलांवर सार्वजनिक खटला (Public Trial) चालवण्यात आला. डॉक्टरवर असा आरोप होता की, त्याने आपल्या घरी चीनमधून तस्करी करून आणलेल्या सिलिकॉनचा वापर करून अवैधपणे ही शस्त्रक्रिया केली.
या प्रकरणात ज्या दोन 20 वर्षीय तरुणींवर ब्रेस्ट सर्जरीचा आरोप आहे की, त्यांनी आपली 'फिगर' (शरीराचा आकार) चांगला करण्यासाठी हे ऑपरेशन केले होते. सार्वजनिक खटल्यादरम्यान डॉक्टर व्यासपीठावर मान खाली घालून उभा होता. तर, दोन्ही तरुणी लाजेमुळे आपला चेहरा वर करू शकल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. सरकार आता अशा प्रकरणांवर कडक कारवाई करत आहे.
हेही वाचा - Sanae Takaichi: जपानच्या इतिहासात नवा अध्याय! LDP पक्षाच्या साने ताकाची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याची शक्यता