नवी दिल्ली: देशातील भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या लोकपाल संस्थेचे अधिकारी लवकरच सर्वात आधुनिक आणि आलिशान बीएमडब्ल्यू कारमध्ये प्रवास करताना दिसतील. विशेष म्हणजे, लोकपाल अध्यक्ष आणि सात सदस्यांना प्रत्येकी BMW 3 Series 330Li मॉडेलचे कार देण्यात येणार असून, या प्रत्येक कारची किंमत जवळपास 70 लाख रुपये आहे. लोकपाल अध्यक्ष आणि सात सदस्यांसाठी केंद्र सरकार जवळपास 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करणार आहे.
ही BMW 3 Series 330Li कार अत्याधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि वेगासाठी ओळखली जाते. ही कार लांब-चाकांची असल्याने पटकन पिक-अप पकडते. लोकपाल सदस्यांना अधिक सुरक्षित आणि आधुनिक प्रवास सुविधा मिळावी, या उद्देशाने ही खरेदी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्सची डिलिव्हरी पुढील महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार मिळाल्यानंतर, बीएमडब्ल्यू कंपनीकडून चालक आणि कर्मचाऱ्यांना सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातून कारच्या सर्व फिचर्स आणि सुरक्षा प्रणालींचे ज्ञान दिले जाईल.
हेही वाचा: Technical Glitch On SpiceJet Flight: स्पाइसजेटच्या दिल्ली-पटना विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाणानंतर काही वेळातच विमान परतलं
दरम्यान, लोकपाल अध्यक्ष आणि सात सदस्यांसाठी महागड्या कार्स देण्याच्या सूचना काढल्यामुळे देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या लोकपालांसाठी एवढ्या महागड्या गाड्यांची गरज काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. लोकपालांसाठी एवढ्या महागड्या देण्यावरून सोशल मीडियावरही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.