Thursday, February 12, 2026 03:52:56 PM

Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत पाऊस? हवामान खात्याचा महत्वाचा इशारा; 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाची शक्यता

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून, बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्य आणि शेतीवर होत आहे.

maharashtra weather update फेब्रुवारीत पाऊस हवामान खात्याचा महत्वाचा इशारा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाची शक्यता

छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा टोकाचा वाढला असून, ऐन फेब्रुवारी महिन्यात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असताना महाराष्ट्रातून मात्र थंडी गायब झाली असून, आता विजांच्या कडकडाटासह पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला असून, नागरिक 'कधी थंडी, तर कधी उकाडा आणि पाऊस' अशा विचित्र हवामानाचा सामना करत आहेत.

राज्यात डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी अनुभवल्यानंतर जानेवारीपासून तापमानात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. 1 जानेवारी रोजी झालेल्या पावसानंतर थंडीचा जोर ओसरला असून सध्या उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाने आज छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. 'ऐन हिवाळ्यात पावसाचा सडा' यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा: India-US Trade Deal : भारतासाठी खुशखबर! मोदींसोबतच्या चर्चेनंतर अमेरिकेनं हटवला भारतावरील टॅरिफ, आता फक्त ‘इतका’ कर भरावा लागणार

पुणेकर सध्या एका विलक्षण अनुभवातून जात आहेत. शहरात गेल्या दोन दिवसांत किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. परिणामी, सकाळी आणि रात्री गारठा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. पुणेकरांच्या भाषेत सांगायचे तर, ते "एकाच दिवसात उन्ह, वारा, पाऊस" अनुभवत आहेत. तापमानातील या फरकामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे.

हवामानातील या टोकाच्या बदलांसोबतच वाढते वायू प्रदूषण हा राज्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. काही प्रमुख शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरल्याने श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. थंडी गायब होऊन पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने विषाणूजन्य आजारांचा (Viral Infections) प्रादुर्भाव वाढला असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतात थंडीची लाट असली तरी महाराष्ट्रात सध्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी असून, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप कायम राहण्याची शक्यता आहे. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतीकामांना खीळ बसली असून फळबागांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Air India Aircraft: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात तोच बिघाड, 'या' कारणामुळे लंडन विमानतळावर मोठी खळबळ


सम्बन्धित सामग्री