छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी आज गुरुवारी पैठण येथे संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी आयोजित मोर्चात राज्य सरकारला इशारा देत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, "धनंजय मुंडे यांनी जे प्रयोग सुरू केलेत आणि जे षडयंत्र सुरू केलेत, ते आता आपल्या समर्थकांना रास्ता रोको करण्याचे, मोर्चे काढण्याचे व आंदोलने काढण्यास सांगत आहेत. यामागे दुसरे कुणीही नाही. तेच आहेत. पण ते जास्त खोलात जात आहेत हे त्यांना लक्षात येत नाही."
जरांगे पुढे म्हणाले, "तुम्ही संतोष देशमुखांच्या पाठिशी उभे न राहता आरोपींच्या पाठिशी उभे राहण्याचे काम तुमच्या लाभार्थी टोळीच्या माध्यमातून सुरू केले. तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की, तुमच्या कुटुंबातील कुणी गेले तर आम्हीही असेच मोर्चे काढायचे का?" यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला की, संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत एकही व्यक्ती एक इंचही मागे हटणार नाही.
👉👉 हे देखील वाचा : ४० सुशिक्षित बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना
"आम्ही या प्रकरणात आरोपींना सोडणार नाही. विशेषतः परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील आरोपींनाही आम्ही सोडणार नाही." त्यांनी सरकारला इशारा दिला की, "या दोन्ही प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर सरकारला आमच्याशी गाठ आहे."
जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवत त्यांना आपल्या लाभार्थी गुंडांच्या टोळ्यांना थांबवण्याचा सूचक इशारा दिला. ते म्हणाले, "धनंजय मुंडे राज्याच्या हितासाठी काम करत आहेत का? तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. पण तुम्ही तुमच्या गुंड टोळीला आमच्याविरोधात आंदोलन करण्यास सांगता. आरोपींना साथ देता. धनंजय मुंडे यांची चाललेली दिशा चांगली नाही. हे सुरू राहिले तर सर्व जाती आपापल्या आरोपींच्या पाठीमागे उभ्या राहतील."
👉👉 हे देखील वाचा : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री पवारांची ?
मनोज जरांगे यांनी ओबीसींच्या मागे लपण्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या कथित कृतींचा निषेध केला. ते म्हणाले, "धनंजय मुंडे आपल्या पापांना झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेत आहेत. खून करणारे तुम्ही आणि त्यात ओबीसींना ओढणार, हे कसे चालेल?" जरांगे यांनी स्पष्ट केले की, "आम्ही कोणत्याही जातीला बोललो नाही व बोलणारही नाही, पण गुंडांना सोडणार नाही."
अखेर, जरांगे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, "माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही. मी न्यायासाठी लढेन. मी अन्याय सहन करणार नाही." ते म्हणाले, "धनंजय मुंडे, तुम्ही फसत चालला आहात आणि फसणारच आहात. मी तुम्हाला २५ तारखेच्या उपोषणात काय दाखवतो ते पाहा."
👉👉 हे देखील वाचा : 'बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलणार' पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट
मनोज जरांगे यांनी त्यांचा ठाम निर्णय स्पष्ट केला आणि सांगितले की, "जर आमच्या वाजवी मागण्या न मानल्या गेल्या, तर आम्ही आंदोलनाची तीव्रता आणू. मराठ्यांना आरक्षणासाठी मी लढणार आहे."
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.