Friday, March 13, 2026 10:56:20 PM

Why Scientists Looking for Gypsum: खडकाच्या पोटात जिवंत सृष्टी, मंगळग्रहावरच्या आयुष्याबद्दलचं कोडं सुटणार? ; या एका खनिजामुळे शास्त्रज्ञही चकीत

हा शोध भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

why scientists looking for gypsum खडकाच्या पोटात जिवंत सृष्टी मंगळग्रहावरच्या आयुष्याबद्दलचं कोडं सुटणार  या एका खनिजामुळे शास्त्रज्ञही चकीत

मंगळावर कधी काळी जीवन होतं का? हा प्रश्न मानवजातीला अनेक दशकांपासून सतावत आहे. लाल ग्रहावरच्या निर्जीव भूप्रदेशाकडे पाहताना उत्तर शोधणारे शास्त्रज्ञ आता पृथ्वीवरील एका विचित्र आणि अतिशय कठीण ठिकाणी पोहोचले आहेत. चिलीतील अटाकामा वाळवंट, समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन किलोमीटर उंचीवर वसलेले सालार दे पाजोनेलेस (Salar de Pajonales) हे खारट, गोठवून टाकणारे आणि प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणांनी झळकणारे मैदान म्हणजे जणू पृथ्वीवरील ‘लहानसा मंगळ’च! म्हणूनच येथे झालेला ताजा अभ्यास वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या संशोधनाचा केंद्रबिंदू ठरला तो जिप्सम (Gypsum CaSO4·2H2O) हा खनिज घटक. पृथ्वीवर तसेच मंगळावरही आढळणाऱ्या या खनिजात जीवन टिकून राहू शकते का, याचा शोध घेण्यात आला. शास्त्रज्ञांनी सूक्ष्मजीवांनी हजारो वर्षांच्या कालावधीत तयार केलेल्या स्तरित खडकांच्या रचना (Stromatolites) यांचा सखोल अभ्यास केला आणि इथेच आश्चर्याचा धक्का बसला.

हेही वाचा: Indian Rupees Value in Iran : भारताचे 100 रुपये म्हणजे इराणमध्ये लाखो रियाल! युद्धाच्या काळात इराणी चलनाची मोठी घसरण

खडकाच्या पृष्ठभागाखाली अवघ्या काही मिलीमीटर अंतरावर जिवंत सूक्ष्मजीव सापडले! जिप्सम पारदर्शक असल्याने तो आवश्यक सूर्यप्रकाश आत पोहोचू देतो, पण हानिकारक किरणांना अडवतो. त्याचबरोबर तो अत्यल्प प्रमाणात आर्द्रताही साठवतो. बाहेरचे वातावरण अत्यंत प्रतिकूल असतानाही खडकाच्या आत सूक्ष्मजीवांनी त्यांचे अस्तित्व टिकवले होते. म्हणजेच, जिप्समने जणू नैसर्गिक संरक्षण कवचाचे काम केले.

इतक्यावरच ही कथा थांबत नाही. स्ट्रोमॅटोलाइट्सच्या आत खोलवर संशोधकांना प्राचीन जीवाश्म आणि जीवनाचे रासायनिक ठसेही सापडले. याचा अर्थ असा की, सूक्ष्मजीव मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषांना जिप्समने सील करून लाखो वर्षे जतन केले. म्हणजेच, हा खनिज घटक केवळ जीवनाचे आश्रयस्थान नसून त्याचा ‘इतिहास जपणारे संग्रहालय’ही ठरू शकतो.

मंगळावर जिप्समचे मोठे साठे असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमा या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या वाळवंटात जिप्सम जीवन टिकवू शकतो, तर मंगळावरही तो प्राचीन जीवनाच्या खुणा लपवून ठेवत असण्याची शक्यता अधिक बळकट होते. अटाकामातील हा शोध म्हणजे मंगळावरील जीवनाच्या गूढाचा दरवाजा उघडण्याची पहिली चावी ठरू शकते आणि कदाचित मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शोधाची नांदीही.

हेही वाचा: IND vs AFG Schedule: भारत-अफगाणिस्तान मालिकेचे वेळापत्रक जाहीर; रोहित-विराटसह शुभमन गिल मैदानात परतणार


सम्बन्धित सामग्री