Tuesday, November 18, 2025 02:47:18 AM

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी जलद! आता द्रुतगती महामार्ग होणार 'दहा पदरी'

मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताना वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मोठा निर्णय घेतला आहे.

mumbai pune expressway  मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी जलद आता द्रुतगती महामार्ग होणार दहा पदरी

मुंबई: मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताना वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या द्रुतगती मार्गाचे आठ ऐवजी दहा पदरीकरण (10-laning) करण्याचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. सध्या द्रुतगती मार्गाचे दहा पदरीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि व्यापारीदृष्ट्या गजबजलेला मार्ग आहे. या महामार्गावर दररोज हजारो नागरिक, पर्यटक आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित वाहनांची वर्दळ असते. सध्या या महामार्गावर दोन्ही बाजूंना चार-चार पदरी असे एकूण आठ पदरी रस्ते आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहनसंख्येमुळे या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषत: सणासुदीच्या काळात आणि शनिवार-रविवारी प्रवाशांना तासनतास महामार्गावर अडकून राहावे लागते.

ही समस्या लक्षात घेऊन एमएसआरडीसीने महामार्गाचे दहा पदरी सुपरहायवेमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे आणि पुढील दहा ते बारा दिवसांत तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. शासनाचा हिरवा कंदिल मिळाल्यानंतर काम तात्काळ सुरू करण्यात येईल.

या प्रकल्पानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दहा पदरीकरणामुळे प्रवास अधिक वेगवान होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि पुणे-मुंबई प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या घटेल. सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो, परंतु या प्रकल्पानंतर हा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

भव्य प्रकल्पाचा खर्च किती?

या दहा पदरीकरण प्रकल्पासाठी अंदाजे 14,260 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सुमारे 1,420 कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ होणार आहे. एकूण बांधकाम खर्च 8,440 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या महामार्गाच्या विस्ताराचे काम 2026 मध्ये सुरू होऊन 2029-30 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule: सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप..., महसूल मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य

दररोज 65 हजार वाहने, आठवड्याच्या शेवटी 1 लाखांहून अधिक

सध्या या महामार्गावर दररोज जवळपास 65,000 वाहने प्रवास करतात, तर शनिवार-रविवारी हा आकडा 1 लाखांच्या वर पोहोचतो. यामुळे वाहतुकीचा ताण सतत वाढत आहे. भविष्यात वाहनसंख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता एमएसआरडीसीने हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवास वेळ कमी होणार नाही, तर वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि अर्थिक विकासालाही चालना मिळेल. पर्यटन आणि औद्योगिक गुंतवणूक या दोन्ही क्षेत्रांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. 2030 पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे दहा पदरी सुपरहायवेमध्ये रूपांतर झाल्यानंतर, हा मार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक आणि वेगवान महामार्गांपैकी एक ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


सम्बन्धित सामग्री