पुणे: नारायणगाव-जुन्नर मार्गालगतच्या साकारनगरी परिसरात सोमवारी रात्री उशिरा एक थरारक घटना घडली. 18 वर्षीय तनिष नवनाथ परदेशी हा युवक अंधारात रस्त्याच्या कडेला उभा राहून फोनवर बोलत होता, तेवढ्यात अचानक झाडीतून एक बिबट्या झेपावत पुढे आला. क्षणार्धात त्याच्या पोटरीवर तीक्ष्ण नखांचे घाव उमटले आणि तनिष खाली कोसळला. त्या भीषण परिस्थितीतही त्याचा जीव थोडक्यात वाचला हीच खरी दिलासादायक बाब ठरली. तातडीने त्याला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेहण्यात आले आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या हल्ल्याची बातमी मिळताच वनविभागाची टीम त्वरित घटनास्थळी पोहोचली. ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी करताना फक्त 200 फूट अंतरावर तब्बल तीन बिबटे फिरत असल्याचे स्पष्ट झाले. वारुळवाडीसह आसपासच्या भागात गेल्या चोवीस तासांतच पाळीव प्राण्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण वाढलं आहे. वाढते धोके ओळखून वनविभागाने आठ पिंजरे बसवले असून नागरिकांनी रात्री अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा संचार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढलेला आहे. ओतूर, शिवनेरीपर्यंतच्या घटनांनी मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर वळणावर पोहोचल्याचे दिसत आहे. विशेषतः कृषी कामे करणारे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक सतत भीतीच्या छायेत जगत आहेत.
हेही वाचा: Ambadas Danve On Govt: फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अंबादास दानवेंचा महायुतीवर निशाणा; ‘अपयशांची यादी’ जाहीर करत केले गंभीर आरोप
वनविभागाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती तितकीशी नियंत्रणात येताना दिसत नाही. दरम्यान, शिवनेरी गडाच्या पायथ्याशीही बिबट्याचे दर्शन झाले आहे. दोन बिबटे एकाच वेळी रस्ता ओलांडताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. वनविभागाच्या मते, साधारणपणे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रात एक बिबट्या असतो. मात्र, गेल्या काही दिवसांत आंबेगाव, शिरूर आणि आता पुन्हा जुन्नरमध्ये दिसणाऱ्या बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे संख्येत वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.
स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यात निर्माण झालेली दडपणाची भावना अधिक वाढत आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांपैकी अनेक केवळ कागदावरच राहतात. प्रत्यक्ष अंमलबजावणीचा वेग मंदावलेला दिसतो. बिबट्यांचे वाढते हल्ले, पाळीव प्राण्यांचे मृत्यू आणि मानवजीवनावर येणारा धोका यामुळे परिस्थिती अधिक गंभीर रूप धारण करत आहे. या घटनांच्या मालिकेमुळे नारायणगाव-जुन्नर परिसरात अनिश्चिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यात चिंता वाढली असून वनविभागाने तातडीने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाढत आहे.
हेही वाचा: Loan Waiver in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 'ही अट' नाही; 25 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार