नाशिक: निसर्गाचा कोप कधी कोणत्या रूपाने येईल, याचा नेम नसतो. सध्या नाशिककर एकीकडे रणरणत्या उन्हाच्या झळांनी होरपळून निघत असतानाच, दुसरीकडे सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण परिसरात एका वेगळ्याच संकटाने पाय पसरले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून या भागात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका सुरू असून, जमिनीच्या पोटातून येणाऱ्या भयावह आवाजांनी नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 'आगीतून फुफाट्यात' अशी अवस्था झालेल्या स्थानिकांमध्ये सध्या भीतीचे प्रचंड वातावरण असून, रात्रीची झोप आणि दिवसाची चैन हरवली आहे.
सुरगाण्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा आणि गोंडाळविहीर या दुर्गम भागांत सध्या भूगर्भीय हालचालींचा थरार पाहायला मिळत आहे. यातील सर्वात मोठा धक्का 5 मार्चच्या मध्यरात्री 11 वाजून 52 मिनिटांनी जाणवला. जेव्हा संपूर्ण गाव गाढ निद्रेत होते, तेव्हा अचानक जमिनीखालून तोफेचा गोळा डागावा तसा मोठा आवाज झाला.
या आवाजाने आणि धक्क्याने घरांवरील पत्रे अक्षरशः थरथरू लागले आणि स्वयंपाकघरातील भांडी जमिनीवर कोसळली. हा धक्का इतका अनपेक्षित होता की, अनेकजण भांबावून घराबाहेर पळाले. हा थरार इथेच थांबला नाही, तर दुसऱ्या दिवशी 6 मार्चला सकाळी 10 वाजून पाच मिनिटांनी पुन्हा एकदा जमीन हादरल्याने लोकांच्या काळजाचा ठोका चुकला.
हेही वाचा: IND vs NZ Ahmedabad Narendra Modi Stadium : 2023 च्या वर्ल्ड कपची आठवण पुन्हा जागी! 'मोदी स्टेडियम'वरील अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, राशा गावाजवळील डोंगराळ भागातून वारंवार विचित्र आणि गूढ आवाज येत आहेत. हे आवाज झाल्यानंतर साधारण एक ते दोन सेकंद जमीन वेगाने हादरते. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावांमध्ये निसर्गाची ही हालचाल नेमकी काय सुचवत आहे, या विचारानेच नागरिकांची भंबेरी उडाली आहे. काही ठिकाणी जुन्या घरांच्या भिंतींना बारीक तडे गेल्याच्याही चर्चा आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या मनात या धक्क्यांमुळे मोठी असुरक्षितता निर्माण झाली असून, पुन्हा मोठा धक्का येईल का? या भीतीने अनेक कुटुंबे घराबाहेर मोकळ्या जागेत आश्रय घेत आहेत.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जमिनीची ही 'अस्वस्थता' प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. वारंवार होणाऱ्या या कंपनांमुळे संपूर्ण तालुक्यात तणावाचे सावट आहे. "आम्ही निसर्गाच्या दयेवर जगत आहोत, पण प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे," अशी आर्त हाक उंबरठाणवासियांनी दिली आहे. या भागात तातडीने 'भूकंपमापन यंत्र' (Seismograph) बसवून या हालचालींचा शास्त्रीय अभ्यास करावा, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. जोपर्यंत तज्ज्ञांकडून ठोस माहिती मिळत नाही, तोपर्यंत अफवांचे पीक येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
भूगर्भातील या हालचाली केवळ नैसर्गिक बदल आहेत की एखाद्या मोठ्या आपत्तीची पूर्वसूचना, याचा शोध घेणे आता अनिवार्य झाले आहे. जिल्हा प्रशासनाने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने या भागात तज्ज्ञांचे पथक पाचारण करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. सुरक्षितता ही केवळ घोषणा न राहता, ती कृतीत उतरणे काळाची गरज आहे. उन्हाच्या चटक्यांनी अंगाची लाहीलाही होत असताना, मनाला पडलेली ही 'भूकंपाची भेग' भरून काढण्याचे आव्हान आता यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
हेही वाचा: Amitabh Bachhan: अयोध्येत 'शहेनशहां'चा नवा सातबारा; राम नगरीत अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या जमिनीची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल