Wednesday, February 18, 2026 08:01:02 AM

Pune Bangalore Highway: महामार्गांवर कोंडीचे 'ग्रहण'; पुणे - मुंबईनंतर आता पुणे-बेंगळुरू हायवे ठप्प; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

एका संकटातून सावरत असतानाच प्रवाशांना पुन्हा एकदा महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागत आहे.

pune bangalore highway महामार्गांवर कोंडीचे ग्रहण पुणे - मुंबईनंतर आता पुणे-बेंगळुरू हायवे ठप्प महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोल्हापूर: गेल्या दोन दिवसांपासून पुणे - मुंबई महामार्गावर रखडलेल्या प्रवाशांना 33 तासांनंतर कुठे सुटकेचा नि:श्वास टाकता आला होता, तोच आता राज्यातील दुसऱ्या मोठ्या महामार्गावर वाहतुकीचा 'खोळंबा' झाला आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरनजीक असलेल्या किनी टोल नाका परिसरात आज सकाळी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. एका संकटातून सावरत असतानाच प्रवाशांना पुन्हा एकदा महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागत आहे.

कांद्याचा 'सडा' आणि वाहनांच्या रांगा

पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने कांद्याने गच्च भरलेला एक ट्रक हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील ओढ्याच्या पुलावर आला असता अचानक पलटी झाला. या अपघातामुळे ट्रकमधील शेकडो क्विंटल कांदा महामार्गावर विखुरला गेल्याने पुण्याकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली असून, रस्त्यावर विखुरलेला कांदा आणि अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे किनी टोलनाका ते कराडच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा: Jay Ajit Pawar : अजित पवारांच्या आठवणीत जय पवारांची आणखी एक भावनिक पोस्ट; म्हणाले, "तुमचे शब्द कायम माझ्या मनात..."

विकासाच्या कामात सुरक्षेचा 'बळी'?

सध्या कागल ते सातारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याच कामांतर्गत घुणकी नजीकच्या ओढ्यावरील पूर्वेकडील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तेथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी, सर्व भार पश्चिमेकडील पुलावर पडत असून, या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी अचानक वळण घ्यावे लागत असल्याने चालकांचा वाहनावरील ताबा सुटतो. 'घाई अपघाताला निमंत्रण देते' असे म्हटले जाते, मात्र येथे रस्त्याच्या तांत्रिक रचनेमुळेच अपघातांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

अपघातांचे सत्र थांबेना

घुणकी येथील हा पूल आता वाहनचालकांसाठी 'डेथ ट्रॅप' ठरू लागला आहे. आजच्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी यापूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सहापदरीकरणाचे काम करत असताना पर्यायी मार्गाची सोय आणि योग्य दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याची भावना प्रवासी व्यक्त करत आहेत.

वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू

सद्यस्थितीत पोलीस प्रशासनाकडून क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महामार्गावर विखुरलेला कांदा बाजूला करून किमान एक मार्गिका सुरू करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा होत नाही, तोपर्यंत वाहनचालकांनी धीर धरावा किंवा शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सलग दोन दिवस महामार्गावरील या 'चक्काजाम'मुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.

हेही वाचा: Mayor Election: महानगरपालिकेच्या 'महापौर' पदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडमोडी; भाजपचे 65 नगरसेवक अचानक 'नॉट रिचेबल'; नेमकं चाललंय काय?


सम्बन्धित सामग्री