पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आता मद्यपी वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोर्चा वळवला आहे. "मद्य पिऊन गाडी चालवाल, तर गाठ आमच्याशी आहे," अशा कडक शब्दांत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मद्यपींना तंबीच दिली नाही, तर थेट कारवाईची ‘ब्लू-प्रिंट’ मांडली आहे. दोन वेळा मद्यपान करून गाडी चालवताना पकडले गेल्यास आणि तिसऱ्यांदा तोच गुन्हा केल्यास संबंधित वाहन थेट जप्त केले जाणार आहे.
सोशल मीडियावर झळकणार मद्यपींचे चेहरे
पुणे पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता आता सामाजिक भीतीचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे ठरवले आहे. नियम मोडणाऱ्या तळीरामांची छायाचित्रे पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर (Social Media) प्रसारित केली जाणार आहेत. इतकेच नाही, तर ही छायाचित्रे थेट संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला पाठवून त्यांचा एकप्रकारे ‘डिजिटल सत्कार’ केला जाईल. "भर चौकात पोलिसांच्या शैलीत मद्यपींचा खास पाहुणचार होईल," असे सूचक विधानही आयुक्तांनी यावेळी केले.
हेही वाचा: NCP Politics : दिल्लीला जाणं रद्द करून पवारांची पुण्याकडे धाव! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; अजितदादांनंतर कोणाकडे धुरा?
शिवाजीनगरच्या शिबिरात एक हजार तळीरामांना खडे बोल
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत एका विशेष समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, यात रस्ते सुरक्षा शिकायला आलेले नागरिक नव्हे, तर यापूर्वी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’मध्ये कारवाई झालेले एक हजार वाहनचालक हजर होते. स्वतः पोलीस आयुक्तांनी त्यांना समोर बसवून रस्ते नियमांचे महत्त्व आणि मद्याच्या धुंदीत होणाऱ्या अपघातांची भीषणता समजावून सांगितली.
एकाची चूक, दुसऱ्याचा नाहक बळी
"मद्यप्राशन करून वाहन चालवणे म्हणजे केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालणे नव्हे, तर रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप पादचाऱ्यांचा आणि शिस्तप्रिय वाहनचालकांचा घात करणे होय," असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. एका मद्यपी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एखादे हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त होते, ही वस्तुस्थिती मांडताना आयुक्तांनी उपस्थितांचे डोळे उघडले. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त हिंमत जाधव यांचीही उपस्थिती होती.
आता दर आठवड्याला होणार ‘झाडाझडती’
पुणे पोलिसांनी हा उपक्रम केवळ एकदिवसीय न ठेवता, अशी समुपदेशन शिबिरे आता दर आठवड्याला आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, पुणे पोलिसांची नजर आता प्रत्येक कोपऱ्यावर असणार आहे. 'अति शहाणपण' दाखवून मद्यधुंद अवस्थेत स्टिअरिंग हाती घेणाऱ्यांना आता कायद्याचा ससेमिरा आणि सामाजिक नाचक्की या दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा: BMC Mayor Election: मुंबईत 'गड' महायुतीचा, पण 'चाव्या' ठाकरेंकडेच? प्रभाग समित्यांच्या गणिताने वाढवलं टेन्शन