Saturday, February 14, 2026 04:23:32 AM

Pune Train Updates: हुतात्मा ते गरीबरथ... ब्लॉकमुळे पुण्यातून सुटणाऱ्या 'या' 26 एक्स्प्रेस रद्द; पाहा बदललेले मार्ग आणि वेळा

यामुळे 26 एक्स्प्रेस आणि 12 डेमू गाड्या रद्द असून अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

pune train updates हुतात्मा ते गरीबरथ ब्लॉकमुळे पुण्यातून सुटणाऱ्या या 26 एक्स्प्रेस रद्द पाहा बदललेले मार्ग आणि वेळा

पुणे: रेल्वे प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि तितकीच कडू बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या दौंड - काष्टी स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे आणि नॉन-इंटरलोकिंगचे अत्यंत महत्त्वाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या तांत्रिक कामासाठी शनिवार, 24 जानेवारी आणि रविवार, 25 जानेवारी असे सलग दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. भविष्यातील वेगवान प्रवासासाठी हा निर्णय घेतला असला, तरी सध्या मात्र पुणे - सोलापूर आणि पुणे - भुसावळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडणार आहे.

या दोन दिवसांच्या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, एकूण 26 एक्स्प्रेस आणि 12 डेमू गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे - नागपूर (गरीबरथसह), पुणे - अमरावती, पुणे - सोलापूर (हुतात्मा व इंटरसिटी), पुणे - नांदेड आणि पुणे - हरंगुळ यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच हडपसर - सोलापूर डेमू आणि पनवेल - नांदेड एक्स्प्रेसच्या प्रवाशांनाही पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे.

हेही वाचा: Earthquake In Tibet: नेपाळनंतर आता तिबेट हादरलं; जमिनीत 10 किमी खोल हालचाल, तिबेटमधील भूकंपाने शास्त्रज्ञांची चिंता का वाढवली?

केवळ गाड्या रद्द करूनच रेल्वे प्रशासन थांबलेले नाही, तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. जणू काही रेल्वेला वळसा घेऊन आपले गंतव्य स्थान गाठावे लागणार आहे. यशवंतपूर - चंदीगड, तिरुअनंतपुरम - मुंबई आणि हुबळी - निजामुद्दीन या गाड्या लोणावळा - कल्याण - मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. सातारा - दादर एक्स्प्रेस ही गाडी जेजुरी - पुणे मार्गे धावणार असून जम्मूतवी - पुणे एक्स्प्रेसच्या प्रवाशांनाही बदललेल्या मार्गाचा स्वीकार करावा लागेल.

वेळेचे गणितही या ब्लॉकमुळे बिघडले आहे. ज्या गाड्या सुरू राहतील, त्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. यामध्ये पुणे - हावडा एक्स्प्रेस तब्बल चार तास उशिराने सुटणार असल्याने प्रवाशांचा मोठा हिरमोड होणार आहे. त्यापाठोपाठ पुणे - जम्मूतवी आणि कुर्ला - विशाखापट्टणम या गाड्या दोन तास, तर पुणे - राणी कमलापती एक्स्प्रेस एक तास उशिराने मार्गस्थ होईल. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गैरसोय टाळण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर (Inquiry Counter) गाड्यांच्या सद्यस्थितीची खात्री करून घ्यावी. रेल्वेच्या विकासासाठी हे दुहेरीकरणाचे पाऊल आवश्यक असले, तरी या दोन दिवसांत प्रवाशांना मात्र या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार, हे निश्चित.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: हुडहुडी गायब, आता उकाडा वाढणार; हवामानाचा मोठा यू-टर्न, नेमकं काय घडतंय?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या