पुणे: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate,HSRP) बसवण्याची 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत उलटून आता महिना झाला आहे. जानेवारी महिन्यात ज्यांनी आधीच बुकिंग केले होते, त्यांची कामे प्रशासनाने युद्धपातळीवर पूर्ण केली खरी, परंतु अद्यापही अनेक वाहने या सुरक्षा कवचाविना रस्त्यांवर धावत आहेत. आता प्रशासनाचा संयम सुटला असून, येत्या 18 फेब्रुवारीपासून विना-HSRP वाहनांवर दंडात्मक कारवाईचा 'बडगा' उगारला जाण्याची दाट शक्यता आहे.
केंद्र सरकारने एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. ही केवळ एक प्लेट नसून वाहनांच्या सुरक्षेचा आणि ट्रॅकिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे. जानेवारी महिन्यात हजारो वाहनधारकांनी शिस्त दाखवत ही प्रक्रिया पूर्ण केली, तर काहींना फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या तारखा मिळाल्या होत्या. हे लक्षात घेऊन प्रशासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत 'ग्रेस पिरियड' म्हणजेच सवलतीचा काळ दिला आहे. मात्र, ही सवलत म्हणजे 'सूट' नसून ती केवळ तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली संधी आहे, हे वाहनधारकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
येत्या 18 फेब्रुवारीपासून आरटीओ (RTO) विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या मोहिमेत केवळ नंबर प्लेट नसेल तरच दंड होईल असे नाही. जर तुमची नंबर प्लेट नसेल, तर आरटीओ अधिकारी तुमच्या वाहनाचे मालकी पत्र, परवाना (License), विमा (Insurance) आणि पीयूसी (PUC) अशा सर्वच कागदपत्रांची कसून चौकशी करतील. यापैकी एकाही कागदपत्रात त्रुटी आढळल्यास वाहनधारकाच्या खिशाला मोठा कात्री लागण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा: Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची आमदारकी टांगणीवर? या नेत्याने मांडलं संख्याबळाचं धक्कादायक गणित, राजकीय वर्तुळात खळबळ
प्रशासकीय पातळीवर सुरुवातीला 'फिटमेंट सेंटर' कमी असल्याची तक्रार झाली होती. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओने फिटमेंट सेंटर्सच्या संख्येत वाढ केली. असे असतानाही अनेक नागरिक 'उद्या करू' या मानसिकतेत राहून याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. "वेळ कोणासाठी थांबत नाही" यानुसार आता प्रशासनानेही धोरण कडक करण्याचे ठरवले आहे. वाढीव सेंटर्स असूनही जर वाहनधारक उदासीन असतील, तर कारवाईशिवाय पर्याय उरत नाही, अशी भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे.
पुण्यासारख्या महानगराचा विचार केला, तर एकट्या डिसेंबर महिन्यात तब्बल 50 हजार वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली होती. हा वेग पाहता सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. यामुळेच आता परिवहन विभाग पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन 'अभय' देणार की थेट दंडात्मक कारवाईची 'मोहीम' फत्ते करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अखेरच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि आरटीओच्या दंडापासून वाचण्यासाठी वाहनधारकांनी तातडीने नोंदणी पूर्ण करणे हिताचे ठरेल. अन्यथा, 18 फेब्रुवारीनंतर रस्त्यावर उतरताना 'खिशाला कात्री' बसण्याची पूर्ण तयारी ठेवावी लागेल.
हेही वाचा: ZP Panchayat Samiti Election Results 2026 : जिल्हा परिषद , पंचायत समितीचा निकाल, जाणून घ्या LIVE UPDATE