Wednesday, February 18, 2026 06:31:10 PM

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाण्यासाठी करावी लागणार कसरत, 'या' भागात 10 दिवस असणार पाणीटंचाई

महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

pune water cut  पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी  पाण्यासाठी करावी लागणार कसरत या भागात 10 दिवस असणार पाणीटंचाई

पुणे: "पाणी हेच जीवन" असं आपण म्हणतो, पण सध्या हेच पाणी वाहून नेणाऱ्या मुख्य वाहिनीला 'ग्रहण' लागल्याने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पवना बंधाऱ्यातून शहराच्या तहानलेल्या भागांकडे धावणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली असून, यामुळे विश्रांतवाडी, विमाननगर आणि कळस परिसरातील नागरिकांना पुढील आठ ते 10 दिवस पाण्याचा थेंब न थेंब मोजून मापून वापरावा लागणार आहे.

नेमकं काय होणार?

रावेत येथील नाल्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवणारी 700 मि.मी. व्यासाची महाकाय जलवाहिनी फुटली आहे. ऐन हिवाळ्यात या वाहिनीला लागलेल्या भगदाडामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, महापालिकेच्या यंत्रणेसमोर हे गळतीचे 'आव्हान' उभे राहिले आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी, तांत्रिक गुंतागुंतीमुळे हे काम पूर्ण होण्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विस्कळीत पाणीपुरवठा 

बंडगार्डन पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या उपनगरांना या गळतीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विश्रांतवाडीचा काही भाग, विमाननगर परिसर, कळस माळवाडी, जाधववस्ती आणि म्हस्के वस्ती यांचा समावेश आहे. या भागांत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद नसला तरी, तो अत्यंत कमी दाबाने आणि अनियंत्रित स्वरूपात होणार आहे. त्यामुळे घरगुती कामांचे नियोजन करताना गृहिणींची मोठी कसरत होणार, हे निश्चित.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी का बदलला? धक्कादायक माहिती समोर

महापालिकेची 'कसरत' आणि पर्यायी मार्ग

"दुष्काळात तेरावा महिना" अशी स्थिती ओढवू नये म्हणून महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. संजय पार्क, वर्माशेल आणि बोपखेलमधील गणेशनगर या भागांना पर्यायी जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र, मुख्य वाहिनीच 'व्हेंटिलेटर'वर असल्याने उपलब्ध पाण्याचा दाब कमी राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. जोपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा रुळावर येणे कठीण दिसत आहे.

नागरिकांना आवाहन: संयम हीच गुरुकिल्ली

पुणे महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, पुढील 10 दिवस पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. पिण्याच्या पाण्याची साठवणूक करून ठेवावी आणि शक्य असल्यास बागेसाठी किंवा गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर टाळावा. ही केवळ तांत्रिक अडचण नसून नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय थांबवण्याची जबाबदारी देखील आहे.

हेही वाचा: Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी एका दिवसातच 20 हजारांनी स्वस्त; तर सोने ...


सम्बन्धित सामग्री